नंदुरबार गवळी समाजातर्फे जळगावच्या अग्निवीर सैनिक शुभम गठरीचा सन्मान
नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय.. वंदे मातरम... या घोषणांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर सैन्य दलात निवड झालेल्या शुभम गठरीचे स्वागत करण्यात आले. भारतमाता प्रतिमा,तिरंगा ध्वज,शाल,श्रीफळ आणि पुष्पहार देऊन शुभम गठरीचा नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे सन्मान करण्यात आला. या सन्मानाने अग्निवीर जवान शुभम गठरी भारावून गेला. भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील जैसलमेर येथे शुभम कर्तव्य बजावणार आहे.
जळगाव येथील उमेश खंडूजी गठरी यांचे सुपुत्र शुभम उमेश गठरी या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. अग्निवीर म्हणून भारत मातेच्या सेवेसाठी शनिवारी राजस्थान जैसलमेर (भारत-पाक बॉर्डर ) येथे हजर होणार आहे. जळगाव येथून नंदुरबार, बडोदा मार्गे जैसलमेर येथे रेल्वेने जाणार आहेत. तत्पूर्वी नंदुरबार गवळी समाजातर्फे सैनिक शुभम गठरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी जळगाव येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे (387/22) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश खंडूजी गठरी यांचे सुपुत्र शुभम उमेश गठरी यांची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल माहिती दिली. तसेच समाजातील तरुणांनी देखील प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महादू हिरणवाळे यांनी केले. शुभम उर्फ गौरव गठरी हा जवान देवगिरी बँकेचे मॅनेजर गंगाराम गठरी आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गठरी यांचा पुतण्या आहे.
या सत्कार प्रसंगी नंदुरबार पंचमंडळी अण्णा घुगरे, काशिनाथ गोडळकर, लक्ष्मण यादबोले तसेच प्रकाश घुगरे, सेवानिवृत्त शिक्षक जी. एस.गवळी, रेल्वेचे निवृत्त कर्मचारी अशोक गवळी,नगर पालिका निवृत्त कर्मचारी पांडुरंग यादबोले , राजेंद्र लक्ष्मण लगडे (वावद) आनंदा घुगरे, जळगाव येथील उमेश खंडूजी गठरी आणि समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments