Type Here to Get Search Results !

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अभिनव पाऊल – तळोदा प्रकल्प कार्यालयातर्फे “आश्रमशाळा विकास कृती आराखडा” चे अनावरण

 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अभिनव पाऊल – तळोदा प्रकल्प कार्यालयातर्फे “आश्रमशाळा विकास कृती आराखडा” चे अनावरण



नंदुरबार, :

शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सर्वांगीण विकास मिळावा, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या वतीने “आश्रमशाळा विकास कृती आराखडा” तयार करण्यात आला असून, त्याचे आज अधिकृत उद्घाटन शासकीय आदिवासी आश्रमशाळा, शिर्वे येथे करण्यात आले.


हा उपक्रम मा. आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून, यावेळी ई-क्लासरूमचे उद्घाटन देखील करण्यात आले.


🔹 आराखड्याची वैशिष्ट्ये:

हा कृती आराखडा प्रामुख्याने सहा महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करतो –


⦁ शैक्षणिक गुणवत्ता: मूलभूत अध्ययन पातळी, ई-क्लासरूम, अध्ययन-कौशल्य विकास

⦁सहशालेय उपक्रम: खेळ, कला, सांस्कृतिक विकास

⦁ विद्यार्थ्यांचे आरोग्य: नियमित आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य, स्वच्छता

⦁ शालेय सुविधा: पाणी, वीज, वसतिगृह गुणवत्ता

⦁ आहार व्यवस्थापन: पोषणमूल्य, स्वयंपाकगृह चाचणी, सहभागात्मक व्यवस्थापन

⦁ शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन: शिक्षक व्यवस्थापन, अनुपस्थिती नियंत्रण, तंत्रस्नेही कामकाज


शून्य खर्च आधारित नवोपक्रम:

या आराखड्यातून तांत्रिक, आर्थिक आणि मानव संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन शून्य खर्चावर आधारित उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यात नेटवर्क कनेक्टिव्हिटी, शिक्षकांची कमतरता, अपूर्ण इमारती, पायाभूत सुविधा अशा अडचणींवर स्थानिक उपाय शोधण्यावर भर देण्यात आला आहे.


उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती:

उद्घाटन सोहळ्यास मा. आमदार राजेश पाडवी, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी राजू किरवे, सहाय्यक गटविकास अधिकारी, पुरवठा निरीक्षक, प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, मुख्याध्यापक नीता वसावे, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पार्श्वभूमी:

तळोदा प्रकल्प कार्यालयाने या आराखड्याद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक स्पर्धेत टिकवून ठेवण्याचे नाही तर त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता बालकांच्या मनोवैज्ञानिक, बौद्धिक आणि सामाजिक गरजा ओळखून उपाय आखण्यात आले आहेत. या कृती आराखड्यात “नवोपक्रम, सहभाग, उत्तरदायित्व व शिस्त” या चार सूत्रांवर विशेष भर दिला गेला आहे.


पुढील दिशा:

तळोदा प्रकल्प कार्यालयाचा हा आराखडा संपूर्ण राज्यातील आदिवासी प्रकल्पांसाठी आदर्श व अनुकरणीय मॉडेल ठरू शकतो. प्रत्येक आश्रमशाळेला दर्जा, सुविधा व गुणवत्ता या सर्व बाबतीत सशक्त करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.


 "शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे आणि प्रत्येक आदिवासी बालकापर्यंत हे परिवर्तन पोहचवण्याचा प्रयत्न हा आमचा शाश्वत संकल्प आहे."

— अनय नावंदर, सहा. जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी


#AshramshalaKritiAarakhda #TalodaProjectOffice #AnayNavandarIAS #RajeshPadvi #AdiwasiShikshan #InclusiveEducation #DigitalEducation #TransformingSchools #EclassroomTaloda

Post a Comment

0 Comments