‘‘चळवळीची पिकली पाने,
हल्ली लागलीत बघा गळू....
वैचारिक बाप जाता सांगा
शुभेच्छांकडे कसा मी वळू...’’?
- दादासाहेब गो.पी. लांडगे
आज बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी वयाची 77 वर्ष पुर्ण करीत आहे. त्याला घट दिवस म्हणावा की वाढदिवस? त्यानिमित्ताने आप्तेष्ट, पत्रसृष्टीसह विविध क्षेत्रातील आबालवृद्ध, मित्रगण अल्पशा प्रमाणात का होईना भेटीसाठी येतात, समाज माध्यमातून शुभेच्छा पाठवित असतात. आजही शुभेच्छा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आजचा दिवस शुभेच्छा स्विकाराव्यात अशी परिस्थिती नाही. गत सप्ताहभरातील घटना अतिशय दु:खदायक आहेत. किलारी भूकंपात मातृपितृ छत्र हरपलेल्या बेसहारा मुलामुलींचे आयुष्य सावरावे म्हणून नळदूर्गला ठाण मांडून बसणारे ‘आपलं घर’ चे आधारवड, कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, समाजवादी चळवळीचे संघर्ष योद्धा, नामांकित संपादक साथी पन्नालाल भाऊ सुराणा, तसेच असंघटीत कामगार कष्टकरी हमाल अशा ‘नाहीरे वाल्या’ वर्गाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे, ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे जनक, श्रमिकांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देणारे, कृतीशिल सत्यशोधक साथी डॉ. बाबा आढाव गेले. पितृतुल्य पन्नालाल भाऊंशी प्रा. आरतीताई बरीदेंकडे आले की अधून-मधून भेट होत असे. ते कार्यक्रमानिमित्त धुळे येथे आले असता सुमारे 35 वर्षापूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या मी चालवित असलेल्या यशवंतनगर गुरुकुल हायस्कुल मैदानावरील शहीद हेमु कलाणी शाखेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या वेळी आले असता दोघा साथींनी माझ्याकडे जेवण घेतले होते. अशा दोघांच्या आठवणी जाग्या झाल्या. दोघे ज्येष्ठ साथी आमच्या पिढीचे तात्विक निष्ठेचे भरण-पोषण करणारे ‘वैचारिक बाप माणसे’ गेली. परवाच नगरपालिका मराठी शाळा नं. 18 मधील माझा लंगोटी बालमित्र, निवृत्त मिलकामगार, एकेकाळी समाजवादी पक्ष व राष्ट्र सेवा दलाचा सक्रीय कार्यकर्ता, एकनाथ व्यायाम शाळेजवळील साथी मधुकर काशिनाथ विभूते यांचे झालेले निधन. तसेच एका माथेफिरुच्या प्राणघातक हल्ल्यात निधन झालेले, सर्व धर्मियांमध्ये प्रिय असलेले, शहरात जातीय सलोखा नांदावा म्हणून परिश्रम घेणारे सर्वधर्मसमभावाचे समर्थक धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धिरजसिंग यांचे कालच झालेल्या निधनाने अवघे धुळे शहर दु:खसागरात बुडाले आहे.
माझ्या महाविद्यालयीन जीवनातील मार्गदर्शक, पितृतुल्य गुरु, शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन मार्गदर्शक भाई प्रा. ल. भा. कुरकुरे यांच्या पत्नी, समाजवादी महिला सभेत लढवय्या विजयाताई (माई) चौक यांच्या सोबतच्या अग्रणी सहकारी, माझ्यासाठी आईपेक्षा कमी नसलेल्या उर्मिला आई कुरकुरे या काही दिवसांपूर्वी पडल्याने त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. 92व्या वर्षी त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांचा मृत्युशी संघर्ष सुरु आहे. त्या जगाव्यात म्हणून आईला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रा. नरेंद्र कुरकुरे, सुन प्रा. डॉ. प्रिया कुरकुरे हे डॉ. योगेश झाडबुके, डॉ. सतीष बोरकर यांच्या बहुमोल वैद्यकीय सल्ल्याने रात्रदिवंस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. जी उर्मिला आई मला दरवर्षी डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देते आईचा तो आशीर्वाद देणारा उजवा हातच जायबंदी झाला आहे मग आशीर्वाद घेणार तरी कसा? आणि त्या देणार तरी कसा? म्हणून अशा दु:खद, वेदनादायी कठीण समयी थरथरणाऱ्या हातांनी पाणावलेल्या डोळ्यांनी शुभेच्छा स्विकारावी काय? हे आपणासही कबुल असेल. म्हणून आजच्या वाढ (घट) दिवसानिमित्त समाजमाध्यम अथवा व्यक्तीगत भेटीत मला शुभेच्छा न देणे हीच माझ्यासाठी या वर्षी खरी शुभेच्छा असेल. सदर दु:खदायक घटना लक्षात घेता आजच्या दिनी आपली शुभेच्छा स्विकारण्यास माझे हात लुळे आहेत. मला क्षमा करावी.
‘‘चळवळीची पिकली पाने,
हल्ली लागलीत बघा गळू....
वैचारिक बाप जाता सांगा
शुभेच्छांकडे कसा मी वळू...’’?

Post a Comment
0 Comments