Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी त. बो.येथे उत्साहात संपन्न

 परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी त. बो.येथे उत्साहात संपन्न

      शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तऱ्हाडी त. बो.येथे केंद्रप्रमुख  अशोक देवरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली. परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब धनराज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम ठाकरे, माजी अध्यक्ष सुरेश ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन ठाकरे उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून झाली. शाळेतील चिमुकल्या मुलींनी ईशस्तवनातील भक्तीगीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले, तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

       सकारात्मक शिस्त हा या परिषदेचा मुख्य केंद्रबिंदू असणारा विषय काथर्दे-दिगर शाळेचे उपशिक्षक शक्ती धनके सर यांनी सकारात्मक शिस्त या विषयावर प्रभावी व सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शारीरिक शिक्षेवरील कायदेशीर तरतुदी, शिक्षेचे विद्यार्थ्यांच्या मेंदूवर होणारे परिणाम, सकारात्मक शिस्तीची तत्त्वे, संवादाधारित वर्गव्यवस्थापन, तसेच सकारात्मक शिस्तीचे उपक्रम अशा विविध अंगांनी विषय उलगडला.

  निपुण महाराष्ट्र मासिक नियोजन या विषयावर  तऱ्हाडी शाळेचे उपशिक्षक लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत केंद्र व वर्गाचे मासिक नियोजन कसे तयार करावे यावर चर्चा करत प्रात्यक्षिक गटकार्य घेतले.

    पालक परिषदेचे महत्त्व श्री सुरनर सर यांनी पालक परिषदेचे स्वरूप, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील तिची भूमिका स्पष्ट केली.

प्रश्नोत्तर व प्रशासकीय मार्गदर्शन केंद्रप्रमुख अशोक देवरे यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन करून विविध प्रशासकीय बाबींची माहिती दिली. डिजिटल डिटॉक्स प्रतिज्ञा वाढत्या मोबाईल वापरामुळे विद्यार्थ्यांवर व समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवस निमित्त उपस्थित सर्वांनी मोबाईलचा मर्यादित व संयमित वापर करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी केले तर आभारप्रदर्शन उपशिक्षिका नीलिमा वसावे यांनी मानले.

परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे, उपशिक्षक उप्पीन, उपशिक्षिका ज्योती पाडवी, नीलिमा वसावे, स्वयंपाकी रंजना सोनवणे, खंडूगीर गोसावी, तसेच सोनवल शाळेचे रुपेशकुमार नागलगावे, ठेंगचे शाळेचे अविनाश बरडे, विनोद सर व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

   या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये सकारात्मक शैक्षणिक दृष्टीकोन, नियोजन कौशल्य आणि जबाबदारीची जाणीव अधिक बळकट झाली.

Post a Comment

0 Comments