फोर्टीफाईड तांदळाबाबत जिल्ह्यात जनजागृती आणि प्रशिक्षण मोहीम यशस्वीरित्या संपन्न
नंदुरबार ।दिनांक ३१ मार्च २०२५ (जिमाका) भारत सरकारने फोर्टीफाईड तांदूळ (गुणसंवर्धित तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, या तांदळामध्ये लोह, फोलिक आम्ल व व्हिटॅमिन बी-12 यांचा समावेश असल्याने तो आरोग्यास अत्यंत फायदेशीर आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात व्यापक प्रशिक्षण व जनजागृती मोहीम राबवण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी केलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या निर्देशान्वये, शहादा, नंदुरबार, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आणि अक्राणी या तहसील कार्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये पॉवर पॉईंट सादरीकरण व माहितीपटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना फोर्टीफाईड तांदळाची माहिती देण्यात आली.
ही मोहीम जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मास्टर्स ट्रेनर्स विठ्ठल काकडे, सचिन शिंदे व हितेश ढाले यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये एकूण १ हजार ९७२ व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यात १ हजार ८३ स्वस्त धान्य दुकानदार, ८८ कल्याणकारी संस्था व वसतिगृहांचे प्रतिनिधी, ५७ अंगणवाडी प्रतिनिधी, ७४४ लाभार्थी व ६२ अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.
तालुका स्तरावरील तहसीलदार, पुरवठा निरीक्षक अधिकारी, पुरवठा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, अशासकीय संस्था आणि महिला बचत गट यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले. प्रशिक्षणावेळी फोर्टीफाईड तांदळाचे फायदे, त्याचे पोषणमूल्य व कुपोषण/ऍनिमिया निवारणासाठी त्याचे महत्त्व यावर माहितीपट व प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणातून फोर्टीफाईड तांदळाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर होऊन जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. “गुणसंवर्धित तांदूळ हे कुटुंब, गाव व देशाच्या आरोग्यवृद्धीसाठी उपयुक्त असून, प्लास्टिक तांदळासंदर्भातील चुकीच्या समजुतींचा पूर्णतः निरास झाला आहे,” असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी वापरले गेलेले माहितीपट व सादरीकरण व्हाट्स ॲप च्या माध्यमातून गावागावातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले असून, त्याची लिंक जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या फेसबुक पेजवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments