Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूकीसाठी 3 एप्रिल ला मतदान

 महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूकीसाठी 3 एप्रिल ला मतदान



नंदुरबार, दिनांक 28 मार्च, 2025 (जिमाका) :

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 2025 च्या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत मतदान होणार आहे.


निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण 41 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी 9 सदस्य निवडण्यात येणार आहेत. वैद्यकीय परिषदेकडे 17 जानेवारी, 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायकानी व नोंदणीचे नुतनीकरण केलेल्या व्यवसायकांच्या नावांचा समावेश मतदार यादीत आहे.  नंदुरबार जिल्ह्यासाठी निश्चित केलेले  506 मतदार आहेत.


जिल्हास्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार येथील वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय खोली क्रमांक 4 येथे एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून सर्व अधिकारी-कर्मचारी यांना निवडणूकीबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.


निवडणूकीच्या मतदानासाठी, मतदार यादीत ज्यांचे नाव समावेश करण्यात आले आहे असे सर्व वैद्यक व्यवसायी व्यक्तीश: मतदान करतील आणि मतदारांची ओळख पटविण्यासाठी  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र, ओखळपत्र किंवा भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा/विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जी ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे, अशी छायाचित्रांसहित ओळखपत्रे, (निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्‍हींग लायसन्स व इतर), नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास, छायाचित्र असलेले दुसरे ओळखपत्र दाखवावे लागेल.


मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 एप्रिल, 2025 रोजी अवर सचिव तथा निर्वाचन अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, सर ज.जी. रुग्णालय व ग्रॅट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे.जे. मार्ग, नागपाडा भायखळा (पूर्व), मुंबई येथे मतपेटी जमा करण्यात येणार आहे.



Post a Comment

0 Comments