त्रिशूल शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्य प्राण्यांविषयी जनजागृती कार्यक्रम
बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे मौजे त्रिशूल येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वन विभागातर्फे दि. ०१ ते ०७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रारंभी विद्यार्थी व विद्यार्थिनींना पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर वनरक्षक त्रिशूल अशोक पावरा यांनी वन्यजीव कशाला म्हणतात याची माहिती दिली तसेच वन्यजीवांना त्रास न देता त्यांचे संवर्धन करणे किती जरुरीची आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर वनरक्षक माळ मंगेश वळवी यांनी आदिवासी बोलीभाषेत वन्यजीवांची ओळख करून दिली तसेच आपल्या भागात आढळणारे वन्यप्राणी व आदिवासी व जंगल यांचा असलेला अतूट संबंध यावर कवितेच्या माध्यमातून जनजागृती केली. वनपाल भुषा भरतसिंग परदेशी यांनी वन्यजीवांची अन्नसाखळी तुटल्यास त्याचे होणारे गंभीर परिणाम यावर विश्लेषण केले. तसेच मानव वन्यजीव संघर्ष कशामुळे निर्माण होत आहेत याची थोडक्यात माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मोहन पावरा यांनी आज वन विभागाचे कर्मचारी यांनी आमच्यासह विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवां बाबतीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. त्यामुळे वनविभागाचे आभार मानले. यावेळी वनविभागातर्फे कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या आदेशाने सहायक वनसंरक्षक सो.(रो.ह.यो.) संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल बिलगाव (प्रा.) श्रीमती चारुशीला काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक अशोक पावरा, मंगेश वळवी, प्रमिला पावरा व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.






Post a Comment
0 Comments