आदिवासी महिलांसाठी सक्षमीकरण योजनेंतर्गत अर्ज मागविणे सुरू
तळोदा : तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनांसाठी दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिली आहे.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) अंतर्गत “अ गट” योजनांमध्ये उत्पन्ननिर्मिती किंवा उत्पन्नवाढीच्या संकल्पनांवर आधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांतील लाभार्थी हिस्स्याच्या रकमेच्या भरपाईसाठी अर्थसहाय्य,वैयक्तिक व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा उत्पन्नवाढीसाठी सहाय्य, तसेच सामुहिक व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत या घटकांचा समावेश आहे.
इच्छुक पात्र आदिवासी महिलांनी www.nbtribal.in या संकेतस्थळावर निर्धारित कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत. दिलेल्या मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करताना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नमुना क्र. 8 अ, ग्रामसभा ठराव (जाहिरातीनंतरचा), रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड, स्वयंघोषणापत्र व शासकीय सेवेत नसल्याचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
अटी व शर्तीप्रमाणे, मागील तीन वर्षांत किंवा चालू वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील केवळ एका सदस्यासच लाभ मिळू शकतो. वैयक्तिक लाभासाठी जास्तीत जास्त पन्नास हजार तर सामुहिक योजनांसाठी सात लाख 50 हजार पर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे.

Post a Comment
0 Comments