सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
तळोदा तालुक्यातील सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयातील आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दुधाबाई पाडवी माध्यमिक विद्यालय, सोमावल येथे यशस्वीरित्या पार पडली. सोमावल केंद्राच्या १४ शाळांमधील शिक्षक-शिक्षिका या परिषदेत सहभागी झाले होते.
या शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, मुख्याध्यापक भास्कर मराठे, पर्यवेक्षक विलास बैसाणे, तज्ञ मार्गदर्शक डॉ. दिपक शेंडे आणि जी.प. शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र बोरसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
शिक्षकांना 'खान अकॅडमी' पोर्टलचे सखोल मार्गदर्शन या परिषदेचा मुख्य उद्देश इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान विषयातील आकलन वाढवणे हा आहे. यासाठी, तज्ञ मार्गदर्शक डॉ. दिपक शेंडे यांनी कार्यक्रमाची ओळख, २०२५-२६ ची उद्दिष्ट्ये, आणि विशेषतः 'खान अकॅडमी' पोर्टलच्या प्रभावी वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले.
त्यांनी खान अकॅडमीवर नोंदणी प्रक्रिया, मास्टरी लर्निंग आणि सक्रियकरण या संकल्पना स्पष्ट करून, त्यावर आधारित उपयुक्त प्रात्यक्षिके सादर केली. शिक्षकांनी आपल्या वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कशी समृद्ध करावी, यावर डॉ. शेंडे यांनी विशेष भर दिला.
याप्रसंगी सोमावल केंद्रात नवीन बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. प्रशिक्षणाविषयी अनिल करांडे, सुरक्षा वसावे, गणेश पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.
तुषार वळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोमावल शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय गीत घेऊन या महत्त्वपूर्ण शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.


Post a Comment
0 Comments