सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित; आयोग अध्यक्षांचे लवकरच दौऱ्याचे आश्वासन – किरसिंग वसावे यांची माहिती
अक्कलकुवा (प्रतिनिधी)
अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील नर्मदा काठावरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांतील आदिवासींचे वनहक्क दावे अद्यापही प्रलंबित असून, त्यांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग हुन्या वसावे यांनी केली आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष मा. अंतरसिंगजी आर्या यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी सेंधवा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत श्री. आर्या यांनी अक्कलकुवा-अक्राणी तालुक्यात लवकरच विशेष दौरा निश्चित करून प्रलंबित वनहक्क दावे मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले.
यापूर्वी ४ व ५ जुलै २०२५ रोजी आयोग अध्यक्ष श्री. आर्या यांच्या नंदुरबार जिल्हा दौर्यावेळीही किरसिंग वसावे यांनी हेच निवेदन सादर केले होते. त्यावेळी त्यांनी दर आठवड्याला सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी पत्राद्वारे दर आठवड्याला सुनावणी घेण्यात येईल असे लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत.
सदर प्रश्नासंदर्भात शासनाने आदेश दिलेले असतानाही मणिबेली, धनखेडी, सिंदुरी, गमण, चिमलखेडी, बामणी, डनेल, मुखडी, मांडवा आदी गावांमधील दावे अजूनही निकाली निघालेले नाहीत. त्यामुळे या गावांतील आदिवासी बांधवांना शेती व उपजीविकेसाठी गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी सांगितले की, “आयोग अध्यक्षांचा दौरा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनावर दाव्यांचा निपटारा करण्यासाठी दबाव वाढेल आणि पात्र लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप होईल, अशी अपेक्षा आहे. अशी माहिती पत्रकारांची बोलतांना दिली.

Post a Comment
0 Comments