थेवापाणी जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा – शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग, वाचन संस्कृतीचे जतन
भारताचे अकरावे राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस जिल्हा परिषद शाळा, थेवापाणी ता. तळोदा येथे अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम वळवी यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या वेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्नेहल सर्जेराव गुगळे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती दिली. त्यांनी वाचनाचे जीवनातील महत्त्व विषद करताना वाचनामुळे ज्ञानाची दारे उघडतात आणि व्यक्तिमत्त्व घडते, असे सांगून सर्वांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी वाचनात सहभाग घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. दुर्गा शांताराम वळवी हिने सलग २ तास वाचन करून उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीने सर्व शिक्षक, पालक व पाहुण्यांनी तिचे भरभरून अभिनंदन केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम वळवी यांनी शाळेच्या नव्या व सशक्त इमारतीबाबत समाधान व्यक्त करत सर्व पालकांना आपल्या पाल्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
आजच्या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा होत असल्याने युवा प्रशिक्षणार्थी श्री. मानसिंग ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या १० सदस्यांनी शालेय वाचनालयास एकूण ५० पुस्तके भेट देत वाचन संस्कृतीच्या जतनासाठी मोलाची भर घातली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिक्षक चंद्रकांत सपकाळे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे वेड लावण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे अति दुर्गम अशा पाड्यावरील शाळेत वाचनाविषयी नवा उत्साह निर्माण झाला असून वाचन प्रेरणा दिनाचा खरा हेतू साध्य झाल्याचे चित्र दिसून आले.



Post a Comment
0 Comments