भुजगाव येथे ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदी कर्मयोगी अभियानाचा’ हरणखुरी आणि भुजगाव गावात भव्य शुभारंभ
ग्रामविकासासाठी समुदाय सहभागातून कृती आराखड्याची प्रभावी मांडणी
धडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भुजगाव गृप ग्रामपंचायतीमध्ये ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदी कर्मयोगी अभियानाचा’ शुभारंभ आज रोजी उत्साहात पार पडला. हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या थेट सहभागावर आधारित असून, ‘तळागाळातील नागरिकांच्या गरजांवर आधारित, लोकसहभागातून निर्माण होणारा विकास आराखडा’ हे या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
कार्यक्रमाची सुरुवात तालुका मास्टर ट्रेनर यांच्या परिचयात्मक सत्राने झाली. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना अभियानाची उद्दिष्टे, महत्त्व, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ग्रामविकास कृती आराखड्याची संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली. त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले की हा उपक्रम गावच्या गरजांची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून त्या अनुषंगाने कृती योजना तयार करण्यासाठी आहे, जेणेकरून शासनाच्या योजना प्रभावीपणे गावात अंमलात येऊ शकतील.
समस्यांचे नोंद सत्र – लोकांच्या अनुभवांमधून विकासाचा आराखडा
दुसऱ्या सत्रात 'समस्या नोंद व चर्चा सत्र' आयोजित करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, महिलाप्रतिनिधी, शेतकरी, युवक, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह इतर ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग होता. गावात भेडसावत असलेल्या पाणीटंचाई, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, रस्ते व वाहतूक, महिला सक्षमीकरण, बेरोजगारी, आणि शेतीशी संबंधित समस्यांचे मुद्दे 'कार्ड शीट्स' वर लिहून घेण्यात आले.
प्रत्येक समस्येवर खुली चर्चा झाली, यातून प्रत्येक घटकाची मते, अडचणी व सूचना समजून घेण्यात आल्या. या चर्चेमुळे गावातील काही लपलेल्या आणि दुर्लक्षित समस्याही उघडकीस आल्या.
शिवार फेरी – गावाचा भौगोलिक आणि सामाजिक आराखडा प्रत्यक्षात पाहिला
या उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘शिवार फेरी’. यामध्ये गावाच्या विविध वाड्यांमध्ये, शेतीच्या परिसरात, सार्वजनिक संस्थांमध्ये, शाळांमध्ये, अंगणवाड्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांवर भेटी देण्यात आल्या. फेरी दरम्यान मास्टर ट्रेनर्स, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी गावाच्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे थेट निरीक्षण केले.
या फेरीतून समोर आलेल्या स्थानिक गरजा, समस्यांचे स्वरूप, विकासाच्या संधी आणि स्थानिक संसाधनांची उपलब्धता यांची नोंद करण्यात आली. त्यानंतर गावातील संभाव्य उपाययोजना आणि प्राधान्यक्रम ठरविण्यात आले.
ग्रामविकास कृती आराखड्याची मांडणी – विकासाच्या दिशेने ठोस पाऊल
संपूर्ण प्रक्रियेचा निष्कर्ष म्हणून 'ग्रामविकास कृती आराखडा' तयार करण्यात आला. या आराखड्यात गावातील प्राथमिक आणि दुय्यम गरजांची नोंद, त्यावरील उपाय, संबंधित विभागांची जबाबदारी, अंमलबजावणीसाठी लागणारा कालावधी, संभाव्य अडचणी आणि संसाधनांची माहिती समाविष्ट आहे. या आराखड्याला ग्रामपंचायतीने सर्वसंमतीने मान्यता दिली.
या अभियानामुळे ग्रामविकासाची प्रक्रिया फक्त कागदावर न राहता, ग्रामस्थांच्या हृदयाशी जोडली जाऊन, अधिक वास्तववादी आणि लोकाभिमुख स्वरूपात पुढे जाणार आहे. शासनाच्या विविध योजना केवळ वितरणापुरत्या न राहता, त्या गरजेनुसार राबविण्यात याव्यात, ही भूमिका यामागे आहे.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका
गावकरी, महिला, युवक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शेतकरी व सर्व घटकांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता. "हे अभियान आम्हाला आमचं गाव समजून घेण्याची आणि बदल घडवण्याची नवी दृष्टी देत आहे," असे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भुजगावच्या सहकार्याने करण्यात आले. तालुका पातळीवरील मास्टर ट्रेनर, विस्तार अधिकारी, आणि संबंधित विभागातील प्रतिनिधींची उपस्थिती लाभली. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे गावातील ग्रामसेवक, सरपंच व अन्य पदाधिकारी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी झाले.
‘आदी कर्मयोगी अभियान’ हा केवळ एक उपक्रम नसून, गावच्या विकासाची एक चळवळ आहे. भुजगाव सारख्या आदिवासी बहुल गावात या अभियानाने एक सकारात्मक बदलाची नांदी केली असून, यामधून निर्माण होणारा कृती आराखडा भविष्यातील योजनांची दिशा ठरवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरपंच अर्जुन जोरदार पावरा
भुजगाव ग्रामपंचायतीमध्ये ‘आदी कर्मयोगी अभियान’ सुरू होणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि संधीची गोष्ट आहे. या अभियानामुळे ग्रामस्थांना त्यांच्या स्वतःच्या गावाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता येत आहे. समस्यांची ओळख, त्यांच्या उपाययोजना, आणि त्यासाठी गावकऱ्यांचा थेट सहभाग यामुळे विकासाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे.
शिवार फेरी, समस्या नोंद सत्र, आणि कृती आराखड्याची प्रक्रिया या सगळ्यांतून गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग दिसून आला, हे विशेष उल्लेखनीय आहे. आम्ही या कृती आराखड्यानुसार काम करत राहू, आणि शासनाच्या योजनांचा लाभ गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू, असा आमचा निर्धार आहे.
मास्टर ट्रेनर गिरीष गोकुळ :
"आदी कर्मयोगी अभियानामुळे गावकऱ्यांना त्यांच्या गावातील समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची संधी मिळाली. लोकसहभागातून तयार झालेला कृती आराखडा हे या उपक्रमाचं यश आहे. ग्रामविकासासाठी ग्रामस्थांची जागरूकता आणि सहभाग अतिशय सकारात्मक आहे, आणि भविष्यात हे अभियान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास वाटतो.
उपसरपंच प्रतिक्रिया श्रीमती कविता पावरा :
"आदी कर्मयोगी अभियानामुळे महिलांनाही गावाच्या विकास प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवता आला. आम्ही आमच्या अडचणी मोकळेपणाने मांडू शकलो, यामुळे खूप समाधान वाटले. महिलांच्या दृष्टिकोनातून विचार केला जात आहे, ही या अभियानाची मोठी जमेची बाजू आहे."










Post a Comment
0 Comments