Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन

 तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन

तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांचा पाढा शिवसैनिकांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्या दरम्यान मांडल्या, यासोबत शिवसैनिकांच्या निवेदनात गोरगरीब रुग्णांच्या जिवनमरणाचा प्रश्न उपस्थित करत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख देवा कलाल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. नंदुरबार हा आदिवासी व आकांक्षीत जिल्हा असून येथे आरोग्य व्यवस्था अक्षरशः सलाईनवर चालली आहे. सातपुडा पर्वतांतील आदिवासी बांधवांना आजही अॅम्ब्युलन्सऐवजी बांबुलन्समधून रुग्णालयात आणावे लागते, हे शासनासाठी लज्जास्पद असल्याचे नमूद केले आहे.


       उपजिल्हा रुग्णालय हे तळोदा व धडगाव तालुक्याच्या हजारो रुग्णांसाठी प्रमुख आधार असून येथे तज्ञ डॉक्टर, मनुष्यबळ, रक्त संकलन केंद्र तसेच रुग्णवाहिका यांची मोठी कमतरता आहे. सध्या केवळ एकच रुग्णवाहिका असून ती वारंवार बंद पडते. रक्त संकलन केंद्र कार्यान्वित नसल्याने सिकल सेल रुग्ण, गरोदर महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक डॉक्टर व अधिकारी नंदुरबारहून प्रवास करून येत असल्याने वेळेवर हजेरी लागत नाही, असेही सांगण्यात आले.


 शिवसेनेच्या मागण्यांमध्ये – रिक्त पदे त्वरित भरणे, तज्ञ डॉक्टर व कर्मचारी नेमणे, रक्त संकलन केंद्र सुरू करणे, किमान दोन रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे व स्थानिक पातळीवर डॉक्टर- कर्मचारी नेमून वेळेवर सेवा सुनिश्चित करणे – या मुद्द्यांचा समावेश आहे.


       या निवेदनावर  तळोदा शहरप्रमुख देवा कलाल, तालुका प्रमुख विपुलभाऊ कुलकर्णी, व्यापारी महासंघ अध्यक्ष आनंदभाऊ सोनार, युवासेना शहरप्रमुख तुषार भांडारकर, युवासेना उपशहरप्रमुख हर्षल चौधरी, निखिल सोनार (सामाजिक कार्यकर्ता), ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल, शिवसैनिक भुषण सोनार व जितु गुरव (शिवसैनिक) या यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आक्रमक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments