आईविना पोरक्या नवजात बालकासाठी देवदूत धावला..
शहादा-तळोदा आमदारांकडून माणुसकीचं दर्शन.. आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी....
आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा' बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी...
तळोदा: आईचं छत्र हरपलेल्या एका नवजात बालकासाठी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे अक्षरशः देवदूत बनून धावले आहेत. मतदारसंघातील मोहिदा शिवारातील एका गरीब कुटुंबात प्रसूतीदरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या या बालकाच्या वैद्यकीय उपचाराची आणि भविष्यातील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आमदार पाडवी यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक होत आहे, तर या बालकाला त्यांच्या रूपाने मामा मिळाला आहे.
मोहिदा शिवारातील कल्याणी कोळी या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांना कलावती फौंडेशनच्या रुग्णवाहिकेतून धुळे रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मातेच्या मृत्यूनंतर नवजात बालकाची प्रकृती बिघडली. जन्मता:च त्याचे वजन अवघे दीड किलो असल्याने तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मृत मातेला धुळ्याहून मूळ गावी आणून अंतिम संस्कार करण्यात आले.
आमदार पाडवी नंदुरबार रुग्णालयात भेट
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी तत्काळ माणुसकीचं दर्शन घडवत थेट नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सध्या उपचाराधीन असलेल्या या नवजात बालकाच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच, बालकाच्या वडिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. कुटुंबावर आलेल्या या बिकट परिस्थितीत आपण पूर्ण मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मामा बनून स्वीकारली जबाबदारी...
आमदार पाडवी यांनी बालकाच्या वडिलांशी बोलल्यानंतर मोठा निर्णय घेतला. त्यांनी जाहीर केले की, या नवजात बालकाच्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसाठी मदत करण्याबरोबरच, त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ते स्वीकारत आहेत.
एका गरीब आणि गरजू कुटुंबातील बालकासाठी आमदार पाडवी यांनी घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या कृतीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सध्या नवजात बालकाची तब्बेत ठीक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
माझ्या शहादा-तळोदा मतदारसंघातील मोहिदा शिवारात एका आदिवासी कुटुंबातील मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला, हे ऐकून मला खूप दुःख झाले. मी तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येऊन त्या बालकाची तब्येत जाणून घेतली. त्याच्या वडिलांशी संवाद साधल्यानंतर मी निर्णय घेतला आहे की, या नवजात बालकाची संपूर्ण काळजी मी घेणार आहे. त्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी मदत करण्याबरोबरच, त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारलेली आहे."
- राजेश पाडवी, भाजप आमदार





Post a Comment
0 Comments