जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल साहेब यांची प्रकाशा कन्या शाळेस भेट
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भेट देऊन शाळेची प्रगती, शैक्षणिक उपक्रम व भौतिक सुविधा यांचा आढावा घेतला.
या भेटीप्रसंगी शहादा तालुक्याचे गटविकास अधिकारी एस.टी. सोनवणे, गटशिक्षणाधिकारी सुनील तावडे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी. राजपूत, पंचायत समिती अधिकारी वर्ग, सरपंच व ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थीनींनी लेझीम पथक व बुलबुल गटाच्या सादरीकरणातून स्वागत केले. त्याने संपूर्ण परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले.
सीईओ नमन गोयल यांनी शाळेचा प्रगती अहवाल तपासून एकूण पटसंख्या, शिक्षक संख्या व विद्यार्थिनींची उपस्थिती जाणून घेतली. त्यानंतर शिक्षकांशी चर्चा करून आजपर्यंत झालेल्या शैक्षणिक व भौतिक विकासकामांचा आढावा घेतला.
रविंद्र पाटील सरांनी २०१८ पासून ते आजपर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल मांडला. यात कोविड काळातील विशेष कार्य, पी.एम . ई विद्या चैनल वरील लाईव्ह मुलाखत , ग्रामपंचायतीच्या सहकार्याने झालेली भौतिक सुधारणा तसेच विद्यार्थिनींच्या नियमित उपस्थितीमध्ये झालेला यशस्वी बदल अधोरेखित करण्यात आला.
सीईओ नमन गोयल यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अनुभवांविषयी विचारपूस केली. इयत्ता पहिलीच्या वर्गात त्यांनी चटईवर बसून लहानग्यांबरोबर अभ्यास केला. विद्यार्थिनींच्या शंका ऐकून त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केल्याचा प्रसंग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
डिजिटल वर्गातील अध्यापन पद्धतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व विद्यार्थिनींच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी नवोन्मेषी अभ्यासपद्धती अवलंबावी व विद्यार्थिनींच्या नियमित उपस्थितीबाबत उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात.
शाळेतील गणपती पूजनात सहभागी होऊन साहेबांनी धार्मिक-सांस्कृतिक परंपरेला मान दिला.
विशेष म्हणजे त्यांच्या मातोश्रींच्या हस्ते शाळेच्या आवारात ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी विद्यार्थिनी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना साहेबांनी “जास्तीत जास्त वृक्षारोपण करून परसबाग उभाराव्यात, पोषण व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत” असे आवाहन केले.
विद्यार्थिनींमध्ये क्रीडाप्रेम वाढावे, यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे, खेळाचे मैदान विकसित करण्याचे व अधिकाधिक खेळाडू घडविण्याचे मार्गदर्शन साहेबांनी केले.
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी देखील विद्यार्थिनींशी हितगुज साधून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाशा केंद्रातील कन्या शाळा, मुलांची केंद्र शाळा व उर्दू शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधून शाळेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
एकंदरीत शाळेतील कामकाज, शिक्षकांचा उत्साह, विद्यार्थिनींची प्रगती व उपक्रम पाहून मा. नमन गोयल यांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments