कोठार आश्रमशाळेत व्यसनमुक्ती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
तळोदा : जिल्हा पोलीस दल, तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या निमित्ताने कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत "व्यसनमुक्ती" या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ शाळेत पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू लोखंडे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील होते. यावेळी प्रभारी माध्यमिक मुख्याध्यापक निंबा रावळे, शिक्षक जितेंद्र चौधरी, योगेश चव्हाण, पन्नालाल पावरा, विद्या पवार आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेत दहावीचा विद्यार्थी मुकेश सोमा ठाकरे याने प्रथम क्रमांक मिळवला. ललिता रूपात तडवी हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर सागर मधुकर वसावे याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व मुख्याध्यापकांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आपल्या मनोगतात पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलीस दलाने विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शनासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक हंसराज महाले यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments