मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून 'आदर्श ग्राम' बनवण्याचे आव्हान
धडगाव:- मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत अभियानातील विविध 8 महत्त्वाच्या विभागांवरील मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहभागी ग्रामपंचायतींना ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे आव्हान देण्यात आले असून, उत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी मनोज भोसले होते. यशदाचे जिल्हा समन्वयक निता पाटील यांनी अभियानाच्या संकल्पना, उद्दिष्टे व अंमलबजावणी प्रक्रिया स्पष्ट केली. त्यांनी ग्रामपंचायतींनी आपल्या गावाचा समग्र विकास आराखडा तयार करून अभियानाच्या प्रत्येक घटकावर कृतीशील कामगिरी करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत पितांबर पवार, राजू पेंडाकर (कृषी अधिकारी, प.स.), धनराज राजपूत (शिक्षण विस्तार अधिकारी), केशव खर्डे (विस्तार अधिकारी, प.स.), व हर्षल पटले (उप अभियंता, बांधकाम विभाग) यांनी अनुक्रमे कृषी, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, जलसंधारण, आणि महिला व बालकल्याण यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले.
या अभियानाचे खालील 8 महत्त्वाचे घटक विशेषतः अधोरेखित करण्यात आले:
कृषी व संलग्न क्षेत्र विकास
पाणी पुरवठा व जलसंधारण
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन
शिक्षण व मानव संसाधन विकास
महिला व बालकल्याण
आरोग्य व पोषण
बांधकाम व पायाभूत सुविधा विकास
डिजिटल ग्रामपंचायत व सक्षमीकरण
यावेळी उपस्थित ग्रामसेवक, सरपंच, व पंचायत समितीचे कर्मचारी यांनी योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या, त्यावर अधिकाऱ्यांनी उपाय सांगितले. ग्रामपंचायतींनी स्पर्धात्मक पद्धतीने सहभाग घ्यावा व आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून घडवावे, असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले.
सरपंचांची प्रतिक्रिया:
कार्यशाळेनंतर अनेक सरपंचांनी अभियानाबाबत समाधान व्यक्त केले आणि आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सरपंच श्री. अर्जुन पावरा (ग्रामपंचायत - भुजगांव,
"या अभियानामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील नेतृत्वाला स्पष्ट दिशा मिळते. गावाच्या गरजांनुसार विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. अधिकारी वर्गाने दिलेले मार्गदर्शन खूप उपयोगी ठरणार असून गावाच्या विकासासाठी सरकारकडून चांगले धोरण आखले गेले आहे. आता जबाबदारी आमची आहे की आपण किती सजगपणे व पारदर्शकतेने या योजनांची अंमलबजावणी करतो."




Post a Comment
0 Comments