अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा
तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी येथील सामुहिक वन हक्क संदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अक्राणी येथे संपन्न झाली.
सामुहिक वनहक्क क्षेत्रात तातडीने कामे सुरु करण्यासाठी तसेच रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामांना प्राधान्य देऊन वन क्षेत्र वाढविणे व लोकांना रोजगार देऊन स्थलांतर कमी करणे या उद्देश्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
नरेगा महासंचालक यांचे विशेष लक्ष नंदुरबार जिल्ह्यावर असून यावर्षी रोहयो बजेट पण वाढविला गेला आहे. गावातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीने गावातील लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनात रोहयो बद्दल आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे तसेच सामुहिक वन हक्क क्षेत्रात काम करणे हि फक्त वनविभागाची जबाबदारी नसून यामध्ये सर्व यंत्रणा यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्यात सामुहिक वनहक्क क्षेत्रात रोजगार हमी योजना, कृषी विभाग, वन विभाग, ग्रामसभा, बांधकाम विभाग असे सर्व विभाग एकत्र येऊन कामे करत आहेत त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला नंदुरबार जिल्ह्यात सामुहिक वन हक्क क्षेत्रात कामे करायची आहेत अशा सूचना प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी दिल्या.
प्रकल्प कार्यालय यांनी प्राथमिक टप्प्यात 11 गावांमध्ये सर्व यंत्रणा यांनी एकत्र येऊन स्थळ पाहणी करून कामे निवडावी यामध्ये सुरुवातीला सीमांकन करून वैयक्तिक वन हक्क धारक यांचे देखील सीमांकन करून घ्यावे तसेच कृषी विभागाने सामुहिक वन हक्क समितीला एक लाभार्थी म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याला लाभ दिला जातो त्याचप्रकारे वनक्षेत्रात कामे सुरु करावी, जास्तीत जास्त गावात बांबू लागवड करावी, रोहयो विभागाने सामुहिक वन हक्क क्षेत्रात नरेगा मधून सर्व कामे निवडून जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यावा यासाठी जरी निधी उशिरा मिळत असला तरी गावांमध्ये अतिरिक्त संपत्ती व गावाचा विकास या योजनेतून होत आहे त्यामुळे नरेगा, कृषी, पंचायत समिती व तहसील, वनविभाग यांनी एकत्र येऊन कामे करण्याच्या व प्रत्येक विभागाने किमान ४ महिन्यांचा प्लान/ नियोजन बनवून प्रकल्प कार्यालयाला देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
तसेच तालुक्यात प्रत्येक सामुहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना अंमलबजावणी यंत्रणा घोषित करून रोहयोच्या कामांना सुरुवात करावी अशी सूचना देण्यात आली.
जिल्ह्यात भगदरी, हरणखुरी, सरी, पिंपळखुटा, रावलापाणी या गावांमध्ये या पूर्वीच नरेगा मधून कामे करण्यास सुरुवात झाली असून हरणखुरी येथील सरपंच अर्जुन पावरा यांनी कशाप्रकारे गाव स्थलांतर मुक्त केले व गावात विविध विकासात्मक कामे केली याबाबत लोकांना माहिती दिली. यामध्ये त्यांनी रोजगार हमी योजनेतून एका विभागाकडून कामे न घेता ती वेगवेगळ्या विभागातून कामे घेऊन बारामाही म्हणजेच वर्षभर गावात कामे सुरु राहतील अशी कामे घेऊन लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
वैयक्तिक कामे न घता त्यांनी सामुहिक कामांना प्राधान्य देऊन महिन्या नुसार कामे घेतली. पावसाळ्यात वेगळी कामे, हिवाळ्यात वेगळी कामे व उन्हाळ्यात वेगळी कामे. गावात रोहयो संदर्भात प्रत्येक कामांचे मागणी ठराव नमुने तयार केले असून व्यवस्थित कागदपत्रे जोडणी व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सवयंसेवक नियुक्त केलेले आहेत. सामुहिक वनहक्क क्षेत्रात व्यवस्थित शिवारफेरी काढून संपूर्ण जंगलाचा गावातील प्रत्येक नागरिकाने अभ्यास केलेला असून लोकसहभाग सर्वात जास्त आहे तसेच सामुहिक वन हक्क क्षेत्र नियम लाऊन त्यामध्ये कुठलेही अतिक्रमण केलेले नाही. गावात वैयक्तिक लाभाच्या देखील योजना दिलेल्या असून नरेगा ची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत यातून च आज गावातील एकही कुटुंब रोजगारासाठी बाहेरगावी जात नाहीत अशी माहिती अर्जुन पावरा यांनी दिली. तसेच भगदरी सरपंच पिरेसिंग पाडवी यांनी एकूण १२ गावांमध्ये बांबू लागवड करून सामुहिक वन हक्क क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला त्याबाबत लोकांना माहिती दिली. तसेच बांबू समन्वयक निरंजन चोपडे यांनी बांबू लागवडीचे महत्व, प्रक्रिया, त्यातून मिळणारा लाभ व भविष्यातील फायदे याबाबत बैठकीमध्ये माहिती दिली.
बैठकीनंतर लगेच प्रकल्प अधिकारी सह सर्व यंत्रणा, सरपंच व सामुहिक वनहक्क समिती सदस्य सर्वांनी मिळून हरणखुरी गावाला भेट दिली व सामुहिक वन हक्क क्षेत्रात रोजगार हमी योजेंतून झालेले शेततळे, सी.सी.टी., टी.सी.एम., बांबू लागवड, विहिरी, वृक्ष लागवड, मिश्र वृक्ष लागवड, नाला खोलीकरन, तलाव गाळ काढणे इत्यादी कामांची पाहणी केली. हा दौरा इतर सामुहिक वन हक्क प्राप्त गावांमध्ये देखील अशाच प्रकारची कामे करण्यासाठी व इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी काढण्यात आला.
बैठकीला प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, तहसीलदार अक्राणी ज्ञानेश्वर सपकाळे, गट विकास अधिकारी अक्कलकुवा लालू पावरा, सहा. वनसंरक्षक संजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम शेख, निखील एखंडे, श्रीमती काटे, तालुका कृषी अधिकारी धडगाव, तालुका कृषी अधिकारी तळोदा मीनाक्षी वळवी, लघु पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, वनविभागाचे वनपाल, रोहयो विभागाचे तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी तहसील व पंचायत समिती सहा. कार्यक्रम अधिकारी व सर्व PTO व इतर कर्मचारी, सहा. प्रकल्प अधिकारी तळोदा देवेंद्र वाणी , प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, वनजमीन सहाय्यक विक्रम गायवाड, वनहक्क लिपिक गोकुळ शिंदे, ग्रामसभा प्रतिनिधी अशोक राउत, रतिलाल पावरा, सर्व १६ गावांचे सरपंच, भगदरी सरपंच पिरेसिंग पाडवी, हरणखुरी सरपंच अर्जुन पावरा, सरपंच मक्तारझिरा वसंत पाडवी सर्व गावातील सामुहिक वन हक्क समिती अध्यक्ष व सचिव तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.






Post a Comment
0 Comments