स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.
नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे "कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली," अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. वर्षानुवर्षे डोक्यावर ओझे वाहणाऱ्या या गावकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
वडफळी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणारे मोरही हे महसुली गाव विकासापासून पूर्णपणे अलिप्त आहे. गावात फक्त चौथीपर्यंतची शाळा आणि अंगणवाडी वगळता स्वातंत्र्याच्या खुणाही दिसत नाहीत. खेमसिंग वसावे, हुपसिंग वसावे, भिका तडवी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, आमच्या गावात रस्ताच नसल्याने विकासाची गंगा कशी येणार, असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी लवकरात लवकर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
वाहतुकीचा फेरा व अतिरिक्त खर्च मोरही गावापासून
मोलगी-डेडियापाडा राज्य महामार्गावरील पांढरामाती गाव केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे, पण रस्ता नसल्यामुळे नागरिकांना आधी बगदा गाठून, तिथून मोवाण आणि वडफळी मार्गे पांढरामातीपर्यंत पोहोचण्यासाठी १४ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. तसेच, दुसऱ्या बाजूने हुणाखांब, वेहगी, बर्डी आणि उकला मार्गे पिंपळखुटा येथे मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी १६ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो.
यामुळे बाजारासाठी डेडियापाडा किंवा मोलगी येथे जाण्यासाठी नागरिकांना दोन्ही बाजूने सुमारे ३०० रुपये भाड्यापोटी खर्च करावे लागतात, जो त्यांच्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड ठरत आहे.
विद्यार्थी आणि रुग्णांची परवड
रस्त्याअभावी मोरही गावातील विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होतात. गावात असलेली जिल्हा परिषद शाळा देवगंगा या नदीच्या काठावर आहे, ज्यामुळे ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना नेण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. ७८ वर्षांनंतरही या गावाला रस्ता का नाही, असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

Post a Comment
0 Comments