रांझणी येथील कौशल्य भारत केंद्रात शेतकऱ्यांना ड्रोन प्रशिक्षण
तळोदा : तालुक्यातील रांझणी येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित कौशल्य भारत केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमात ३० शेतकऱ्यांनी सहभागी होऊन ड्रोन हाताळणीचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले.
सुरुवातीला शेतकऱ्यांची स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष ड्रोन हाताळणी बाबत तांत्रिक माहिती देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये ड्रोनचे कार्य, त्याची ऑपरेटींग प्रणाली, वापराचे नियम, फवारणीतील अचूकता व सुरक्षितता या बाबींचा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला. विशेषतः अचूक व वेळेवर फवारणी, मजुरीची बचत आणि उत्पादनक्षमता वाढवण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.या उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असून, त्यातून स्मार्ट शेतीकडे जाणारा मार्ग खुला झाला आहे.
शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. संस्थेच्या कौशल्य भारत केंद्रामार्फत शेतकरी व युवकांना नविन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणांची आयोजन केले जात असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांनी केले आहे.
या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदाचे संचालक सत्तरसिंग राजपूत, उमेश सोनवणे, गजेंद्र राजपूत, रमण पावरा, राकेश पाटील, भिमा महाले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरात ड्रोन ऑपरेटर महेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे व्यवस्थापन केंद्रप्रमुख जागृत टवाळे यांनी पाहिले.



Post a Comment
0 Comments