देवमोगरा शाळेत आधार नोंदणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम
अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभागाचा उपक्रम
अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभाग अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा देवमोगरा येथे दिनांक २५ जुलै रोजी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. गावकरी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास अक्कलकुवा न्यायलायचे न्यायाधीश व्ही. बी शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर तहसीलदार विनायक घुमरे, अक्कलकुवा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.संग्राम पाडवी, वकील संघाचे सचिव,अॅड.रुपसिंग वसावे, अॅड. आर. पी. तडवी गटशिक्षणाधिकारी नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी धनगर, केंद्रप्रमुख साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच जि.प. शाळा देवमोगरा येथील शिक्षक व केंद्रातील इतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी बोलताना न्यायाधीश व्ही. बी. शितोळे यांनी आधार कार्डचे महत्त्व विशद करताना विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार घुमरे यांनी गावकऱ्यांच्या शंकांचे समाधान करत, शासनाच्या योजनांमध्ये आधारच्या उपयोगाविषयी माहिती दिली.
या शिबिराचा लाभ देवमोगरा व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. आधार कार्डासाठी शहर गाठण्याची गरज न पडता, शाळेतच कमी वेळेत नोंदणी व नविन आधार मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन श्री. गणेश लवांडे सर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विलास पवार, श्री. तुषार पाटील तसेच देवमोगरा शाळेतील सर्व शिक्षक व अक्कलकुवा न्यायलयीन कर्मचारी मयुर पाटील, सुरेश हिवरे यांनी विशेष मेहनत घेतली.



Post a Comment
0 Comments