संतांचे, महापुरुषांचे आचार, विचार आपण प्रत्यक्षात स्वतः कृतीत आणत आपले कर्तव्य जाणले पाहिजे असे प्रतिपादन- प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळावा
तळोदा, / सप्त नगरी न्युज
आपसात वैचारिक मतभेद असू द्या मात्र समाजासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ऋणानुबंध व नातं तेव्हाच टिकते जेव्हा एकमेकांविषयी मान, सन्मान असतो. संतांचे, महापुरुषांचे आचार, विचार आपण फक्त ऐकतो किंवा दुसऱ्यांना सांगतो मात्र प्रत्यक्षात स्वतः कृतीत आणत नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य जाणले पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन यांनी केले.
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री समस्त काचमाळी समाज पंच यांच्या वतीने माळी समाज मंगल कार्यालयात बुधवारी (ता. २३) यशवंत, गुणवंतांचा सत्कार व समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समस्त काचमाळी समाज पंचाचे अध्यक्ष अनिल माळी होते. प्रमुख वक्ता म्हणून नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन होते. यावेळी व्यासपीठावर कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी, समाज पंचाचे उपाध्यक्ष विजय शेंडे, सचिव हिरालाल कर्णकार, माळी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा राणे, उपाध्यक्षा विद्या वाघ, सचिव लीना शेंडे तसेच पंच मंडळ सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र महाजन पुढे म्हणाले की, जीवनात एकूण सात प्रकारचे ऋण असतात. त्यात जन्मभूमी व समाजाचे देखील ऋण असतात आणि ते सर्व ऋण आपण फेडले पाहिजे. या सर्व ऋणातून मुक्त झाल्यावरच मोक्ष प्राप्त होतो. जे काहीच काम करीत नाही आणि जे खूप चांगले काम करतात अश्याच लोकांना जग विरोध करत असते. समाजात पुरुषांसोबतच स्त्रीला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे असे सांगत त्यांनी विविध उदाहरणांचा माध्यमातून समाजातील चुकीचा, चांगल्या बाबींवर प्रकाशझोत टाकला. अध्यक्ष अनिल माळी यांनी गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांना व नागरिकांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी अनेक लहान मुले व मुलींनी संत सावता माळी यांच्या कार्याविषयी माहिती दिली व त्यांच्या कार्यावर कविता सादर केल्यात.
याप्रसंगी उपाध्यक्ष विजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले. पंच सदस्य फुंदीलाल माळी, राम सूर्यवंशी, राजाराम राणे, प्रभाकर सागर, सुनिल सुर्यवंशी, आय. आर. मगरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाज पंच मंडळ व सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.
कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान -
यावेळी विविध क्षेत्रात विशेष कार्याबद्दल निवड झाल्याबद्दल व पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विद्यार्थी, नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याऱ्या गोविंद बत्तीसे, सुदाम सागर, दत्तू कर्णकार या कष्टकरी शेतकऱ्यांच्या विशेष सन्मान करण्यात आला. देणगी दात्यांचा देखील सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments