नंदनगरीत आषाढीच्या पूर्वसंध्येला विठुरायाचा १२ फूट मूर्तीची मिरवणूक
झांज,टाळ मृदंगाच्या गजर अन् माऊली माऊलीचा जयघोष; आज लोकार्पण
नंदुरबार (प्रतिनिधी)- विठ्ठल. विठ्ठल.. विठ्ठला... हरी ओम विठ्ठला, जय हरी विठ्ठलाच्या नाम घोष आणि विविध भक्ती गीते तसेच झांज,टाळ,मृदंगाच्या गजराने नंदनगरीत विठू माऊलीचा १२ फुट उंच मूर्तीची आषाढीचा पूर्वसंध्येला जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.रिपरिप पडणाऱ्या पावसात निघालेल्या मिरवणुकीत हरिभक्त भक्तीरसात चिंब झाले होते.
नंदुरबार नगरपरिषदेचा माध्यमातून शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील लोकनेते स्व. बटेसिंगभैया रघुवंशी उद्यानात आषाढी एकादशीचा मुहूर्तावर १२ फूट उंच भव्य मूर्ती बसविण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल शनिवार दि.५ जुलै रोजी मूर्ती दाखल झाल्यानंतर धुळे चौफुली पासून विठ्ठलानामाचा जयघोष करीत विविध भक्ती गीते तसेच झांज,टाळ,मृदंगाच्या गजर करीत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत कोळदा ता.नंदुरबार येथील संत मीराबाई भजनी मंडळ व गुरुदत्त भजनी मंडळाच्या महिलांनी माऊली माऊलीचा गीतावर नृत्यावर ठेका धरला. शनिमांडळ येथील भजनी मंडळाचे कार्यकर्ते वारकऱ्यांच्या पेहरावत सहभागी झाले होते. अनेक महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवत फुगड्या खेळल्या.मिरवणुकीला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. धुळे चौफुली पासून निघालेली मिरवणूक धुळे रोड, मोठा मारुती मंदिर,नाट्यमंदिर, स्टेट बँक चौक,अंधारे चौक तेथून पुन्हा स्टेट बँक मार्गे लोकनेते स्व.बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानापर्यंत नेण्यात आले. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून देखील भाविक स्वयंस्फूर्तीने आले होते.
रिपरिप पावसातही उत्साह
विठ्ठल नामाचा गजर,झांज,टाळ,मृदुंग आणि भक्ती गीतांवर उपस्थित भाविक भक्तीरसात चिंब झाले होते. रिपरीप पावसातही हरिभक्त विठ्ठल नामात लीन झाल्याचे पाहायला मिळाले.अनेक वयोवृद्ध सहभागी महिलांनी फुगड्या खेळून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
आ.चंद्रकांत रघुवंशी थिरकले
वारकरी संप्रदायात विणेला मोठं महत्त्व असतं.शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी , उद्योजक मनोज रघुवंशी यांनी मिरवणुकीत सहभागी होत गळ्यात वीणा घालून जय हरीच्या जयघोष केला.
आज सायंकाळी लोकार्पण
विठ्ठल माऊलीच्या १२ फूट उंच भव्य मूर्तीचे लोकनेते बटेसिंगभैया रघुवंशी उद्यानात आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सायंकाळी लोकार्पण करण्यात येणार असून, उपस्थितीचे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments