सत्ताधाऱ्यांकडून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आणि करडी नजर
मराठी पत्रकार परिषद पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची टीका
मुंबई :'सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेले की, ताबडतोब फोन फिरवले जातात. माध्यमस्वातंत्र्याची अशी गळचेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. बुधवारी संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जेष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते. परिषद अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवडे, कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख, डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला अध्यक्ष शोभा जयपूरकर आणि मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा अदाटे व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी त्यांच्या ५७ वर्षांच्या सक्रिय राजकीय पत्रकारितेतील कारकिर्दीतील अनेक स्थित्यंतरांबद्दलची निरीक्षणे नोंदवली. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी दोघांसोबत केलेला मासिक सुरू करण्याचा निष्फळ प्रयत्न अशा अनेक आठवणी सांगताना पवार यांनी आणीबाणीच्या दिवसांवरही भाष्य केले. 'आणीबाणीच्या कालखंडात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अग्रलेखाची जागा मोकळी सोडत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला होता. यथावकाश इंदिरा गांधींनी त्या कालखंडाची, निर्णयाची जाहीर माफी मागितली. लोकांनी त्यांचा पराभव केला. पुढे जनता सरकारच्या काळानंतर पुन्हा लोकांनी इंदिरा गांधी यांना निवडून देत माफ केल्याचेही दाखवून दिले. पण आता ५० वर्षांनी त्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत', असे पवार म्हणाले. 'सध्या दिल्लीतील केंद्र सरकारच्या काही उच्चपदस्थ नेत्यांकडे दरदिवशी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून आले, याची बारकाईने चिकित्सा होते. ते सरकारच्या विरोधात असेल, तर संबंधितांना फोन केला जातो. वर्तमानपत्रांचा जाहिरातींचा ओघ कमी होतो. ही माध्यमांची गळचेपी करणाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही', असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार मिळवलेल्या मधुकर भावे यांनीही आपल्या ६० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे उलगडून सांगत, सध्या पत्रकारांनी जागल्याची भूमिका घेत सतत व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारिता हा निखारा आहे. तो धगधगता तर ठेवायचाच, पण तसा तो ठेवताना आपला पदर न जळण्याची काळजीही पत्रकारांनी घ्यायची असते, असे ते म्हणाले. या सोहळ्याला डॉ. नरेंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना 'बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार', ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांना विशेष सन्मान, महेश म्हात्रे यांना ‘आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी अमय तिरोडकर, अभिजित कारंडे, पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावस्कर, दिनेश केळुसकर, श्रीमती सीमा मराठे, बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शर्मिला कलगुटकर तर परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश नाईकवडे यांनी केले.

Post a Comment
0 Comments