“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम
शहादा :- पंचायत समिती शहादा (शिक्षण विभाग) अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आणि जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) नंदुरबार श्री. भानुदास रोकडे यांच्या सहकार्याने, शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “पटसंख्या वाढवा – बक्षीस मिळवा” हा अभिनव व स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शहादा तालुक्यातील प्रत्येक पात्र विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात आणणे, शिक्षणाच्या संधी सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वास वाढवणे हा आहे.
🔹 मुख्य वैशिष्ट्ये:
⦁ पटसंख्येत १५% वाढ करणाऱ्या शिक्षक-शाळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार.
⦁ केंद्रात १०% वाढ झाल्यास केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांचा गौरव.
⦁ गौरव समारंभ दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात येणार.
🔹 विविध उपक्रमांतून यशाची वाटचाल:
तालुक्यातील शाळांमध्ये परिपाठात नवकल्पना, पाढे पाठांतर, बाल संसद, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा, नवोपक्रम स्पर्धा, चेतक फेस्टिवल, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, पाककला, आरोग्य व पोवाडा स्पर्धा, क्षेत्रभेटी, शिष्यवृत्ती योजना, संगणक प्रयोगशाळा, ई-लर्निंग वर्ग अशा अनेक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
🔹 उपक्रमाची यशोगाथा – जि.प.शाळा बामखेडा, ता. शहादा:
गेल्या वर्षी 53 विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या बामखेडा शाळेची यावर्षीची पटसंख्या 62 पर्यंत पोहोचली आहे – म्हणजेच १७% वाढ.
मुख्याध्यापिका श्रीमती आशा देवरे आणि सहशिक्षक श्री अमृतसिंग राजपूत सर यांनी उन्हाळी सुटीत सर्वेक्षण, दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी, पालकांशी संवाद आणि शासनाच्या लाभार्थी योजनांची माहिती देऊन प्रवेश वाढवले.
यामध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रम, स्वच्छ परिपाठ, चेतक फेस्टिवल, पोवाडा स्पर्धा, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा उपक्रमांमुळे गावकऱ्यांचा विश्वास जिल्हा परिषद शाळेवर अधिक दृढ झाला.
गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन
डॉ. योगेश सावळे यांनी शिक्षकांना उद्देशून म्हटले की, “या उपक्रमात सहभागी होऊन केवळ पटसंख्या नव्हे तर गुणवत्तेचा दर्जाही उंचावावा.” शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शाळा सशक्त होणार असून गावाच्या भविष्याची घडण घडवली जाणार आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांच्या नेतृत्वात नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, बालकांमध्ये आत्मविश्वास व गुणांची जोपासना हे विभागाचे सर्वोच्च ध्येय आहे.
.
.
.
#शिक्षणहक्क #पटसंख्या2025 #ZPSchoolsNandurbar #शहादा #InnovativeEducation #शिक्षकगौरव #शाळेवाढवा #QualityEducation #ChetakFestival #NandurbarEducation


Post a Comment
0 Comments