नंदुरबार - कल्याण बसच्या विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप
नंदुरबार (प्रतिनिधी) सर्वसामान्यांपासून सर्वांचीच जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचे नियोजन कोलमडले आहे. सोमवारी नंदुरबार - कल्याण लालपरी बसच्या विलंबामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
प्राप्त माहितीनुसार सोमवार दि. 7 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजता एम. एच. 20 बी एल 4026 क्रमांकाची बस नंदुरबार बसस्थानकावरून मार्गस्थ झाली. मात्र दोंडाईचा येथे गेल्यानंतर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी थांबविण्यात आली. चालक आणि वाहकाने सदर बस दुरुस्तीसाठी अर्धा तास प्रवाशांना ताटकळ ठेवले. बस दुरुस्त करून पुन्हा धुळे मार्गे रवाना केली. त्यानंतर धुळ्याहून सदर बस मालेगाव येथे दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पोहोचली.
नंदुरबार- कल्याण बसमधील अनेक विद्यार्थी व प्रवाशांना वेळेत धुळे आणि मालेगाव येथे पोहोचणे अपेक्षित असताना विलंब झाला. याबाबत अनेक विद्यार्थी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त करीत प्रवासी महासंघाकडे गाऱ्हाणे मांडली.
त्यानुसार महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी नंदुरबार आणि दोंडाईचा आगार प्रमुखांशी संपर्क साधला. यावर नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले की, सदर बस दोंडाईचा आगाराची असल्यामुळे मी अधिक माहिती देऊ शकत नाही. तर दोंडाईचा आगार प्रमुख मिलिंद परदेशी यांनी सांगितले की,सध्या नंदुरबार ते सोनगीर पर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एसटी बसेस विलंबाने धावत आहेत. प्रवाशांना झालेल्या मनस्तापा बद्दल दिलगिरी आहे.

Post a Comment
0 Comments