Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हरणखुरी वनक्षेत्रात ‘सीडबॉल रोपण कार्यक्रम’ अक्राणी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम

 हरणखुरी वनक्षेत्रात ‘सीडबॉल रोपण कार्यक्रम’ अक्राणी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम

             अक्राणी:- वनसंवर्धन आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, शहादा उपविभागीय वन कार्यालयाच्या पुढाकाराने आक्राणी तालुक्यातील हरणखुरी फॉरेस्ट क्षेत्रात "Forest Revival by Seed Ball – Seed Ball Dibbling Program" अंतर्गत एक व्यापक सीडबॉल रोपण मोहीम राबविण्यात आली.

              या उपक्रमात परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक आदिवासी समाज यांच्या सहभागातून एकात्मिक प्रयत्नांनी वनजागृती व हरित क्रांतीचा संदेश देण्यात आला.

       वनक्षेत्राचा पुनरुज्जीवन हेतू -

हरणखुरी हे सातपुडा पर्वतरांगांतील एक जैवविविधतेने समृद्ध परंतु अलीकडच्या काळात झाडतोड, अतिक्रमण व हवामान बदलांमुळे काही प्रमाणात संकटात आलेले क्षेत्र आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सीडबॉल तंत्रा’चा वापर करून नैसर्गिकरीत्या वृक्षनिर्मिती करण्याचा उपक्रम आखण्यात आला. सीडबॉल म्हणजेच स्थानिक झाडांच्या बिया शेण, माती आणि सेंद्रिय खताच्या गोळ्यात भरून बनवलेले बियांचे गोळे, जे थेट जमिनीत फेकून किंवा टाकून नैसर्गिक उगमासाठी योग्य वातावरण तयार करतात.

       सक्रिय सहभाग व व्यापक पेरणी -

या उपक्रमात एकूण 20000 हून अधिक सिड जमिनीवर टाकण्यात आल्या. साग, मोह, बाभूळ, करंज, सीताफळ, अंजन, हिरडा, बेहडा बावा अशा स्थानिक व पर्यावरणपूरक झाडांच्या बियांना प्राधान्य देण्यात आले. या उपक्रमात 300 पेक्षा अधिक स्वयंसेवक, स्थानिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला बचतगट ग्रामपंचायत सभासद तसेच वनविभागाच्या जवानांनी सहभाग नोंदवला.

प्रशासनाचे मार्गदर्शन

या वेळी वनसंरक्षक(प्रा)धुळे वनाधिकारी श्रीमती. निनू सोमराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले:

"आज आपण केवळ बियांचं रोपण करत नाही, तर भविष्यासाठी हिरवळ निर्माण करत आहोत. सीडबॉल हा एक अत्यंत सोपा पण परिणामकारक उपाय आहे, जो भविष्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती वाढवू शकतो. हा उपक्रम स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकला नसता आणि या पुढील काळात या बियांचे ग्रामस्थांच्या पुढाकाराने संरक्षण करतील अशी अपेक्षा आहे ."

सामाजिक सहभागातून पर्यावरण रक्षण - 

या कार्यक्रमामुळे केवळ झाडे लावली गेली नाहीत, तर पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती देखील झाली. अनेक स्थानिक नागरिकांनी वनक्षेत्राची जबाबदारी स्विकारत या बीजगोट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी उचलण्याचा निर्धार केला. विशेषतः आदिवासी समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, नैसर्गिक जीवनशैलीशी असलेली नाळ अधोरेखित केली.

       हरित भविष्याची पेरणी

या अभिनव उपक्रमामुळे अक्राणीतील हरणखुरी वनक्षेत्रात लवकरच नवजीवन फुलणार आणि जैवविविधतेचे आकर्षण बनण्याची शक्यता आहे. शासकीय यंत्रणा आणि स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरेल 


प्रसंगी श्रीमती. निनू सोमराज वनसंरक्षक(प्रा)धुळे, संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार (प्रा.) राजेंद्र सदगीर विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, संजय साळुंके सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो), वनक्षेत्रपाल शहादा, तोरणमाळ, काकडदा, चिंचपाडा , अक्राणी व शहादा सब डिव्हिजन अंतर्गत सर्व वनपाल वनरक्षक, तसेच एस. व्ही.ठक्कर हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक, हरणखुरी गावाचे सरपंच अर्जुन पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनपाल दिलीप पाटोळे,भरतसिंग परदेशी,राकेश ठाकरे,वनरक्षक अनिल पाडवी, रोहिदास पावरा, पवन पाडवी, वसंत पटले, हिम्मत तडवी, उमेश पावरा व वनमजूर इत्यादींनी प्रयत्न केले.



"गावातील जंगल व पर्यावरण यांचं संरक्षण करणं ही आपल्या पिढ्यांची जबाबदारी आहे. वनविभागाच्या सीडबॉल उपक्रमामुळे आमच्या परिसरात नैसर्गिकरीत्या झाडांची वाढ होईल. गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, हे विशेष कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांना ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य राहील आणि ग्रामपंचायत पुढेही वनविभागासोबत असे उपक्रम राबवेल."

श्री अर्जुन पावरा,

लोकनियुक्त सरपंच 

ग्रामपंचायत भुजगाव

Post a Comment

0 Comments