जिल्ह्यातील बोरझर गावाची ‘मधाचे गाव’ योजनेसाठी निवड
राजेश गवांदे
नंदुरबार, दिनांक 13 जून, 2025 (जिमाका) :
महाराष्ट्र शासनाच्या ‘मधाचे गाव’ योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर गावाची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा सदस्य सचिव, मधाचे गांव समिती राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता आणि या प्रस्तावाला शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेसाठी 48 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे यांच्या हस्ते लवकरच बोरझर गावाला ‘मधाचे गाव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात येणार असून या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच समिती सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये खालील कामांचा समावेश आहे:
• जनजागृती मेळावे घेणे.
• सातेरी, मेलीफेरा आणि आग्या मध युनिट प्रशिक्षणासाठी लाभार्थींकडून अर्ज घेणे व त्यांना प्रशिक्षण देणे.
• 90 टक्के दरानुसार साहित्य वाटप करणे.
• ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतींमध्ये सामाईक सुविधा केंद्राची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करणे.
• माहिती दालन आणि सेल्फी पॉईंट तयार करणे.
• ‘मधाचे गाव’ कमान तयार करणे.
• मध प्रक्रिया संच लावून मध प्रक्रिया करणे, बॉटलिंग करणे, लेबल लावून मध विक्री करणे.
• राणी पैदास कार्यक्रम राबवून नवीन वसाहती तयार करणे.
• मध मेणापासून उप-उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देणे.
या योजनेमुळे बोरझर आणि आसपासच्या परिसरातील मधमाशांच्या वसाहतींचे जतन व संवर्धन होईल, तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळून रोजगार निर्मिती होईल. यामुळे लाभार्थींचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मंडळाकडून या गावाचा पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा सदस्य सचिव, मधाचे गाव समिती श्री. गवांदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Post a Comment
0 Comments