नर्मदा जीवनशाळेचा पहिला विद्यार्थी सियाराम सिंगा पाडवी
डॉ. हिरालाल चौधरी बेस्ट फिश फार्मर पुरस्काराने सन्मानित
धडगांव- नर्मदा बचाव आंदोलनाचा युवा कार्यकर्ता व जनआंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या जीवनशाळेतील पहिला विद्यार्थी सिड्या उर्फ सियाराम सिंगा पाडवी यांस मत्स्यपालन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई येथे हिरालाल चौधरी बेस्ट फिश फार्मर पुरस्कार 2024-25 देऊन गौरविण्यात आले. सियाराम सिंगला पाडवी,मुळगाव डनेल ता अक्कलकुवा तालुक्याचा नर्मदा जीवन शाळेचा पहिला विद्यार्थी. नर्मदा बचाओ आंदोलनाने खुप प्रयत्नानंतर ही शासनाची शाळा चालत नव्हती म्हणून गावकऱ्यांच्या मागणी नुसार जीवन शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला.ऐन संघर्षाच्या काळात चिमलखेडी येथे आंदोलनाची पाहिली जीवन शाळा सुरू झाली. सिंगा वेस्ता पाडवी यांचा मुलगा सिड्या याला ही जीवन शाळेत दाखल करण्यात आले. जीवन शाळेची घोषणाच आहे की,जीवन शाला की क्या है बात? लडाई -पढाई, साथ साथ! याप्रमाणे शिक्षणासोबत विद्यार्थी सत्याग्रह, मोर्चे, धरणे आंदोलनात संमिलीत होत असत,सिड्या गाणे म्हणणे,घोषणा देणे यात अग्रेसर.आजही आपण आंदोलनाची जुने व्हिडिओ पाहाल तर त्यात गीत गाणारा, घोषणा देणारा सिड्या दिसेल. सरदार सरोवर धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने चिमलखेडी येथील जीवन शाळा बुडितात आली ,त्यासाठी मुलांनी संघर्ष केला.पुढे ती शाळा मणिबेली येथे स्थलांतरित झाली. चौथी पर्यंत जीवन शाळेत शिकून सिड्या 5वी च्या शिक्षणासाठी धुळे येथे राजेंद्र छात्रालयात दाखल झाला.मग तो सिड्या वरून सियाराम असे नाव त्याच्या शिक्षकांनी दिले.12 वी पर्यंत शिकल्यानंतर सियाराम आंदोलनात पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. ज्या लोकांची घरे व जमिनी सरदार सरोवर धरणात बुडिताखाली आली त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला परंतु जे बुडितातल्या गावातील वरच्या पाड्यावर राहतात किंवा मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी आंदोलनाची सुरुवातीपासून मागणी होती की याच गावांमधील आदिवासी कुटुंबांना मासेमारीचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून शासन दरबारी मागणी व पाठपुरावा सतत सुरू ठेवला त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नर्मदा काठावरील गावांच्या सहकारी सोसायटीला सरदार सरोवर जलाशयावर अधिकार मंजूर करीत,शासनाच्या अनुदानातून जाळे, नावडी, बोट, केज कल्चर, मत्स्यबी, मत्स्य खाद्य दिले. सियाराम ने जवळपास 26 सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. त्याचा संघ बनवला व संघाने सियारामला अध्यक्ष बनवले. सियाराम गावागावात जाऊन मच्छीमार समित्यांना मदत करतो, आता लवकरच धडगाव येथे, मत्स्य मार्केट व मासे साठवणूक साठी वेअर हाऊस बांधकामाच्या जागेसाठी सियाराम पाठपुरावा करीत आहे.
सियाराम मुळे मासेमारी समित्यांच्या शेकडो परिवाराच्या जीवनात मासेमारी वर अधिकार मिळवून देत खऱ्या अर्थाने जहां जमीन डूबी हमारी,पानी-मछली कैसे तुम्हारी? नुकताच सियाराम सिंग पाडवी (ता. अक्कलकुवा) यांनी मत्स्यपालन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ICAR-CIFE (Central Institute of Fisheries Education), मुंबई तर्फे दिला जाणारा डॉ. हीरालाल चौधरी बेस्ट फिश फार्मर पुरस्कार 2024-25 पटकावला आहे. सियाराम पाडवी सन २००८ पासून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त भागात २६ मच्छीमार सहकारी संस्था स्थापन, ७३ किमी क्षेत्रातील 1258 मच्छीमारांना एकत्रित करून शासन योजना प्रभावीपणे पोहचवण्याचे काम, दुर्गम भागात सहकार्याची नवी उंची गाठली. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मा. डॉ. मिताली सेठी यांचे मोलाचे सहकार्य व मत्स्य व्यवसायाविषयी तांत्रिक मार्गदर्शन किरण पाडवी, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले. सियारामच्या या गौरवाबद्दल जनआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधाताई पाटकर, चेतन साळवे, लतिका राजपुत, ॲड. योगिनी खानोलकर, पुण्या वसावे, नूरजी वसावे, ओरसिंग पटले,रामभाऊ चौधरी, सुनील पावरा, गंभीर पाडवी, शामजी पाडवी, जोरदार पावरा, कृष्णा पावरा, नाथ्या पावरा आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment
0 Comments