आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप न केल्यास दि १६ जून रोजी रास्तारोको आंदोलनाचा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने इशारा
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप न केल्यास दि १६ जून रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकारी तसेच मा.पोलीस निरीक्षक तळोदा यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत निवेदनात म्हंटले आहे. की, तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना सन २०२२ मध्ये राबवण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, दुग्ध व्यवसायास चालना देणे, ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे. योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील १२१, तळोदा तालुक्यातील ७१ आणि धडगाव तालुक्यातील १०८ अशा एकूण ३०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या निवडीतून प्रत्येक लाभार्थ्याला एक गट स्वरूपात दोन दुधाळ गायी देण्यात येणार होत्या. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले असून, त्यांनी योजना लागू होण्याची तीन वर्षांपासून प्रतीक्षा केली आहे.
मात्र, आजतागायत या योजनेतून कोणत्याही लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला नाही. लाभार्थ्यांनी वेळोवेळी प्रकल्प कार्यालयात भेट देऊन माहिती विचारली असता, कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, शासनाच्या वचनबद्धतेबाबतही शंका निर्माण होत आहे. सदर योजनेची अधिकृत यादी प्रकाशित होऊन आणि प्रमाणपत्र दिले जाऊन तीन वर्षांचा कालावधी उलटूनही लाभ मिळालेला नसल्यामुळे योजनेची अंमलबजावणी विलंबित झाल्याने आदिवासी महिला बचत गटांची आर्थिक फसवणूक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने ज्या हेतूने ही योजना आणली, तो हेतूच या विलंबामुळे अपूर्ण राहिला आहे. तसेच लाभार्थ्यांचा दुग्ध व्यवसायाचा संकल्पही रखडलेला असून, त्यांचे मनोबल खचले आहे.
या पार्श्वभूमीवर, आमची आपल्यास विनंती आहे की सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात यावा. अन्यथा, एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने व लाभार्थ्यांच्या समवेत दि.१ ६/०६/२०२५ रोजी ब्राह्मणपुर – अंकलेश्वर हायवेवरील तळोदा बायपास चिनोदा चौफुली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रकल्प कार्यालय तळोदा हे जबाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी. ही आदर पुर्वक विनंती असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड गणपत पाडवी तळोदा तालुका दिनेश पाडवी सुभद्रा पाडवी शैलजा पाडवी शिलाबाई वळवी सविता पाडवी जयुबाई पाडवी रमिल बाई वळवी निर्मला शेमले रिना पटले विश्वनाथ वसावे रणछेड वळवी हेमराज वळवी अशोक वळवी चंद्रसिंग पाडवी चंद्रसिंग पाडवी प्रवीण पाडवी कृष्णा वळवी प्रवीण आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments