इंद्रप्रस्थनगर,रूपानगर येथील नागरिकांचा इशारा
येत्या तीन दिवसात रस्ते गटारीचे कामे सुरू न झाल्यास नगरपालिकेसमोर आमरण उपोषण
तळोदा शहरातील इंद्रप्रस्थनगर व रूपानगर येथील रस्ते व गटारींची कामे गेल्या पंधरा महिन्यापासून रेंगाळली असून फेब्रुवारी 2024 मध्ये या नगरांमधील रस्ते खोदण्यात आले होते.गेल्या पावसाळ्यातही नगरवासीयांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. नंतर एप्रिल 2025 मध्ये रस्ते कामे व गटांरींना सुरुवात झाली परंतु तरीही अपूर्ण रस्ते,कुठे गटारींचे पाईपच नाहीत, कुठे चेंबर नाहीत, कुठे रस्ते खोदलेले अशी अवस्था असून मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्याने विद्युत खांब अधांतरी झाले असल्याचे चित्र असून त्यामुळे या नगरांमधील नागरिक वैतागले असून त्यांच्याकडून मुख्याधिकारी तळोदा यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की रस्ते व गटारीचे अपूर्ण कामांमुळे अवकाळी पावसात रस्त्यांवर फिरणे अवघड झाले होते. तसेच या भागात पाणी तुंबण्याची समस्या असून पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरू शकते तर अपूर्ण गटांरी तसेच चेंबर नसल्याने पाणी कुठेही वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी येत असून आरोग्याची समस्या ही उद्भभवत आहे. विद्युत पोलही वारावादळामुळे कधीही उन्मळून पडू शकतात ,जिवीतहानी झाल्यास जबाबदार कोण? असे निवेदनात म्हटले आहे.
सदर रस्ते, गटारींचे कामे नगरपालिकेने तीन दिवसात सुरू करावे अन्यथा नगरवासीय सहकुटूंब पालिकेसमोर आमरण उपोषण करतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निंबा पाटील, पृथ्वीराज मराठे,रविंद्र शिंदे,जितेंद्र कोळी,पंकज वानखेडे, डॉ मेघराज पाटील, नारायण जाधव,दीपक मोरे,गोकुळ धनगर,गणेश पटेल आदी नगरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आमच्या नगरात अपूर्ण रस्ते तसेच गटारी न टाकण्यात आल्याने अवकाळी पावसाचे पाणी घरात शिरले होते. परंतु तेव्हा कामे सुरू असल्याने आज ना उद्यामध्ये गटार होईल असे वाटले होते. परंतु आता काम पूर्ण करण्यासाठी कुणीही फिरकत नसल्याने पावसाळ्यात काय होईल ही चिंता सतावत आहे.
तुकाराम मोरे
रहिवासी, इंद्रप्रस्थनगर
रस्त्याची कामे रेंगाळली असून नगरातील विद्युत पोल कधीही कोसळेल अशी अवस्था असून मोठा अनर्थ घडू शकतो. याबाबत नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. तसेच रस्ते, गटारीच्या कामांची पाहणी करावी.
प्रा. भगवान चिने
रहिवासी, इंद्रप्रस्थनगर.





Post a Comment
0 Comments