नंदुरबारच्या प्रभाग 18 मधील रस्ते कामाच्या खडीमुळे किरकोळ अपघात वाढले, नागरिक त्रस्त
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र. 18 मधील अपूर्ण व निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या खडीमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत.याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गवळीवाडा, कुंभार गल्ली,बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर, (नवा भोई वाडा) भागात नंदुरबार नगर पालिकेतर्फे काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाची चौकशी करण्यात यावी. महात्मा बसवेश्वर नगरातील बालवीर चौकात आजही रस्त्यावर खडी अस्ताव्यस्त पडली असून दररोज किरकोळ अपघात होत आहेत. या धोकेदाय खडीमुळे दुचाकी घसरणे, दूधवाले दुचाकी स्वार,भाजीपाला,फळ विक्रेते, नारळवाले, लोटगाडी धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर या भागातील मारुती आणि महादेव मंदिरात व पिठाच्या गिरणीकडे जाणाऱ्या महिला भगिनी पाय घसरल्याने जायबंदी होत आहेत.ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांसाठी या भागात रिक्षाचालक येण्यास धजावत नाही. अनेक दिवसांपासून पाण्याचे टँकर, खडी, रेती, वाळू, टोकदार लोखंडी सळ्या रस्त्यावर अडथळा ठरत असून याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. या सर्व बाबींचा रहिवासी नागरिकांना त्रास होत असून याबाबत प्रभागातील संबंधित माजी नगरसेवक आणि ठेकेदारावर रोष व्यक्त होत आहे.
चौकट
============
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी नगरसेवक व ठेकेदार कसा असावा ? असा उपरोधिक प्रश्न प्रभाग क्रमांक 18 मधील त्रस्त नागरिक व्यक्त करीत आहेत.
============
कुठलेही प्रशिक्षण नसलेल्या सुपर वायझर आणि मुकादम यांच्याकडून रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असून नागरिकांसह वाहन धारक, रिक्षाचालक, हातगाडीधारक, दूधवाले सारेच त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने प्रभाग क्रमांक 18 मधील रस्ते, गटार कामांची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर महादू हिरणवाळे, जी.एस. गवळी, संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, उत्तम भोई,संजय भदाणे,नरेंद्र मोरे, सागर चौधरी, आकाश जवेरी, सागर कन्हेरे, नितीन तावडे, अशोक कुंभार, विशाल हिरणवाळे,अनिल वाघ, ज्ञानेश्वर चौधरी, गणेश चौधरी, एकनाथ हिरणवाळे, काशिनाथ हिरणवाळे, राजू भोई, सिताराम भोई यांची नावे आहेत.

Post a Comment
0 Comments