Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी -राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश


मुंबई दि.२१ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाला दिले. राजशिष्टाचार विभागात आवश्यकतेनुसार प्रशिक्षण, प्रबोधन आणि कार्यप्रणालीचे निर्धारण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.


सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार विषयक बाबी मध्ये त्रुटी राहिल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राजशिष्टाचार ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य असून महाराष्ट्राचे अवलोकन देश पातळीवर होत असते, त्यामुळे भविष्यात अशी बाब घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.


मंत्री श्री.रावल यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर भविष्यात अशी बाब घडू नये यासाठी विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. व्हीआयपी तसेच व्हीव्हीआयपी व्यक्तींबाबत राजशिष्टाचार विषयक नियम, कायदे, वेळोवेळी निर्गमित झालेले परिपत्रक, केंद्र व राज्य शासनाची या बाबतीत मार्गदर्शक तत्वे हे सर्व एकत्रित संकलित करून त्या बाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. राज्यात राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना राजशिष्टाचार विषयक बाबीचे तंतोतंत पालन करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. राजशिष्टाचार विषयक नियमांमध्ये काळानुरूप काही बदल करणे आवश्यक आहे का हे तपासण्यात यावे. राजशिष्टाचार विषयात तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभ्यास गट तयार करून प्रमाणित कार्यप्रणाली (standard operating procedure) निश्चित करण्यात यावी. विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. देशातील उत्कृष्ट राजशिष्टाचार विषयक प्रणाली विकसित करण्याकरिता आवश्यकता असल्यास सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांनी दिले आहेत.


राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे परदेश दौऱ्यावर असल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रकाशित झाले होते. मात्र मंत्री श्री. रावल हे परदेश दौऱ्यावर नसून देशातच आहेत. नातेवाईकांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने ते व्यस्त होते. त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.



Post a Comment

0 Comments