सेवाभावी जैन परिवाराचे अमळनेर नगरीतील पदार्पण आशादायी
डॉ. बापूसाहेब के. ए. सैंदाणे आमच्या अमळनेर तालुक्यातले वैभव
माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे गुरुउत्तम फार्माच्या उद्घाटनप्रसंगी गौरवोद्गार
अमळनेर- ‘‘धुळ्याचे जैन कुटुंब हे व्यावसायिक नव्हे तर सामाजिक सेवा देणारे असून अशा व्यक्तीमत्त्वाचे अमळनेर येथील पदार्पण आशादायी आहे. जैन परिवाराच्या चांगुलपणाचा अमळनेरकर वासियांना लाभ मिळेल’’ असे प्रतिपादन जैन परिवाराच्या ‘वेलनेस फॉर एव्हर’ शाखेच्या गुरुदत्त फार्माचे उद्घाटन करतांना राज्याचे माजी मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन माजी मंत्री अमळनेरचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी केले. अमळनेर येथील निकुंभ प्लाझा, बाजारपेठ रोड येथे संपन्न झालेल्या शानदार समारंभाच्या अध्यक्षस्थानी धुळ्याचे सुप्रसिद्ध ऑर्थो सर्जन बापूसाहेब के. ए. सैंदाणे हे होते.
आमदार अनिलदादा पाटील पुढे म्हणाले, ‘‘ डॉक्टरांनी दु:ख एैकले तरी रुग्णाचा अर्धा आजार दूर पळतो. त्यापैकीच डॉ. बापूसाहेब सैंदाणे हे असून त्यांचे जन्मस्थान आमच्या अमळनेरचे बोरीकाठ असून कर्मभूमी पांझराकाठ आहे. दोन्ही नद्या अमळनेर तालुक्यातून वाहतात. अमळनेर तालुक्याचे वैभव असलेले बापूसाहेब सैंदाणे यांनी पैशाचा कधीच हिशोब बघितला नाही. दुग्गड परिवाराचे सामाजिक देणं बघून आज संपूर्ण महाराष्ट्रात नवलौकिक असलेले बापूसाहेब सैंदाणे यांची उपस्थिती लाभली. अमळनेर तालुक्यातील ‘हाडासंबंधी’ तक्रारी असलेले रुग्ण मोठ्या विश्वासाने सैंदाणे बापूंच्या दवाखान्याला प्राधान्य देतात अशी विश्वासार्हता दुर्मिळ होत चालली आहे असेही त्यांनी नमूद केले.
धुळे येथील सुप्रसिद्ध ऑर्थो सर्जन बापूसाहेब सैंदाणे अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले, ‘मी अमळनेरच्या बोरीकाठचे अनेकदा पाणी प्यालो याचा मला अभिमान आहे. दुग्गड परिवार हा सेवाभावी असून, वृद्धाश्रम, अंधशाळा यात विविध प्रसंगी जेवण देत असतात. दानशुर व्यक्तीमत्त्वाचे दुग्गड परिवार खान्देशात सेवाभावी परिवार म्हणून ज्ञात असून जीवन-मृत्युशी संबंधित मेडीकल व्यवसाय ते निष्ठेने सांभाळीत आहेत. त्यांना पैशाची हाव अथवा गर्व नाही असेही नमूद केले.
धुळे तालुका पत्रकार संघाचे संस्थापक माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य ईश्वर बडगुजर यांनी मुकटीकरांच्या वतीने दुग्गड परिवारास शुभेच्छा देत गोरगरीब रुग्णांसाठी तन-मन-धनाने मदत करणाऱ्या दुग्गड जैन परिवाराचे कौतुक केले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती समाधान भाऊसाहेब धनगर जयवंतराव गुलाबराव पाटील धुळे येथील जगन्नाथदादा बागले आदींनी शुभेच्छा दिल्या. या शानदार समारंभास उद्घाटक माजी मंत्री आ. दादासाहेब अनिल भाईदास पाटील, समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ बापूसाहेब के. ए. सैंदाणे यांच्यासह अमळनेरसह धुळे-जळगाव जिल्ह्यातून बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल वेलनेस फॉर एव्हर ग्रुपच्या वतीने महेश पाटील, अशोक छाजेड, निवृत्ती बागुल, यश जैन, प्रितम जैन, विजयाताई जैन, पारसमल जैन, विजय जैन आदींनी आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सुप्रसिद्ध सुत्रसंचालक सौ. वसुंधरा लांडगे मॅडम यांनी केले, डॉ. हेमंत पारख यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments