Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

 आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

जळगाव, दि. २८ मे (जिमाका वृत्तसेवा):

चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी आज (बुधवार) घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.

प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले असून, दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

ही घटना वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जाने उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली. संबंधित महिला पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत असताना वाटेतच प्रसववेदना सुरू झाल्याने रस्त्यातच बाळाचा जन्म झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरीत हालचाल करून आरोग्य पथकासह संबंधित भागात भेट दिली. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली असून, बाळ जन्मतः २८०० ग्रॅम वजनाचे होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कर्जाने उपकेंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments