Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आरोग्य विभागातर्फे मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून नियुक्ती

 आरोग्य विभागातर्फे मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून नियुक्ती

जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा)-: आपल्या शारीरिक मर्यादांकडे दुर्लक्ष करून सामाजिक व आरोग्य सेवेत निरपेक्षपणे कार्यरत असलेले रक्तमित्र व आरोग्यदूत मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगावचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली.


                  तप्त उन्हाळ्यामुळे रक्तसाठा टिकवून ठेवणे ही एक मोठी जबाबदारी आहे. थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, गंभीर रुग्ण, रक्तक्षयग्रस्त रुग्ण तसेच प्रसूतीसाठी आवश्यक रक्ताची मागणी कायम असते. यासोबतच सध्या सुरू असलेल्या मिशन सिंदूर उपक्रमाच्या पार्श्वभूमीवरही रक्तसंकलनाची गरज वाढली आहे. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, मुकुंद गोसावी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.


               मुकुंद गोसावी यांनी आतापर्यंत १०० हून अधिक वेळा रक्तदान केले असून, नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करून स्वतःही रक्तदान करत राहतात. समाजातील तरुणांना प्रेरणा मिळावी, ग्रामीण भागातही रक्तदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.


              कोरोना महामारीच्या काळात देखील मुकुंद गोसावी यांनी दिव्यांग मोटरसायकलद्वारे जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली होती. कोविड लसीकरण मोहिमेत देखील ते स्टार प्रचारक म्हणून कार्यरत होते.


                त्यांच्या सामाजिक कार्यामुळे रक्तदान जनजागृतीस नवे बळ मिळणार असून जिल्हा आरोग्य विभागातर्फे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments