राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंचा विकास - सिनेट सदस्य पंकज पाठक
तळोद्यात आमदार चषक हँडबॉल राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न
तळोदा, :- खेळात जय, परायजयाचा विचार न करता खेळाडूंनी मनसोक्त खेळाचा आनंद घेत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले पाहिजे. त्याचबरोबर खेळाडूंनी खेळाडूवृत्तीची जोपासना केली पाहिजे. तळोद्यात राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याने याठिकाणी क्रीडाप्रेमींना उच्च दर्जाचे खेळाचा आनंद घेता येईल असे प्रतिपादन सिनेट सदस्य पंकज पाठक यांनी केले.
महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून आमंत्रित संघाची राज्यस्तीय आमदार चषक हँडबॉल स्पर्धा दिनांक ४ व ५ मे रोजी येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वात्सल्य सेवा समितीचे पंकज पाठक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अमरदीप महाजन होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, भाजप शहरअध्यक्ष गौरव वाणी, जगदीश परदेशी, अमरीश सूर्यवंशी, गोकुळ पवार, योगेश मांडोळे, अनिल पाडवी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य अमरदीप महाजन यांनी सांगितले की, खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांनी खेळांकडे करिअर म्हणून बघावे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक क्षमतेचा विकास तर होतोच त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाच्या विकास देखील साधला जातो. ही स्पर्धा १९ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा हँडबॉल असोसिएशन नंदुरबार, शिक्षणमंत्री प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालय, वात्सल्य सेवा समिती नंदुरबार तसेच स्व. रणछोड बाबा क्रीडा मंडळ, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, बीड, पुणे, जळगाव (चाळीसगाव), धुळे, नवापूर व नंदुरबार (तळोदा) येथील संघांनी सहभाग घेतला. सर्वच सामने अटीतटीचे व थरारक झाले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये व ट्रॉफी बीड येथील संघाने जिंकले. द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये व ट्रॉफी जळगाव (चाळीसगाव) येथील संघाने जिंकले. तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये व ट्रॉफी पुणे येथील संघाने जिंकले. चतुर्थ पारितोषिक ३ हजार रुपये व ट्रॉफी सांगली येथील संघाने जिंकले. यावेळी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट गोल कीपर, बेस्ट कॉर्नर,बेस्ट शूटर आदी बक्षिस देण्यात आले.
दरम्यान ही स्पर्धा नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारी ठरली असून, भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्याचे आयोजन समितीने निश्चित केले. स्पर्धा आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक सुनील सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, संकेत माळी, किशोर माळी, पद्मेष माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.





Post a Comment
0 Comments