वारंवार अवकाळी पावसामुळे भुईमूग काढणीस ब्रेक
शेतातून काढणी करत भुईमुग तोडणी शेतकऱ्यांचे वर्क फ्रॉम होम
तळोदा तालुक्यातील रांझणी,रोझवा पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसनसह परिसरात मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची पेरणी करण्यात आली होती. भुईमूग पीक परिपकव होऊन काढणी सुरू असताना गेल्या पंधरा-वीस दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची समस्या चांगलीच वाढली असून त्यांना आपल्या भुईमूग पिकाची काढणे कशी करावी हा प्रश्न पडला आहे.
सतत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी कुटुंबातील पुरुष, तरुण, बालके यांच्याकडून सकाळच्या प्रहरी शेत गाठून भुईमूग पीक उपटून बैलगाडी, मोटरसायकल यावर बांधून वाहतूक करीत आपापल्या घरी आणण्यात येत असून घराजवळील मांडव, पत्र्याचे शेड येथे टाकून दिवसभर कुटुंबातील सर्वजण भूईमुगाच्या शेंगा तोडणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिसरात शेतकऱ्यांचे वर्क फ्राम होम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान परिसरात भुईमूग पिक चांगल्या अवस्थेत होते. एकरी उत्पन्न,भावही चांगला येणार असा अंदाज होता.परंतु सततच्या पावसाने चांगलेच नुकसान केले असून अद्यापही मोठ्या प्रमाणावर भुईमूग काढणी बाकीच असून शेतकऱ्यांकडून भुईमूग काढणीस वेग देण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments