खरीप हंगामात शेतकऱ्यांना वाजवी दरात बी-बियाणे, किटकनाशके, खते उपलब्ध व्हावीत. तसेच बोगस बियाणे, किटकनाशके, खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी मागणी
तळोदा, :-
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वाजवी दरात बी-बियाणे, किटकनाशके, खते उपलब्ध व्हावीत. तसेच बोगस बियाणे, किटकनाशके, खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्राहक पंचायतच्या तळोदा शाखेच्या वतीने तहसीलदार दीपक धिवरे व तालुका कृषी अधिकारी मिनाक्षी वळवी यांना दिले.
याबाबत निवेदनात नमूद केले की, सध्या कृषी हंगाम सुरु असून शेतकरी वर्ग पेरणी पूर्वीची मशागतीच्या कामाला लागलेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना वाजवी व माफक दरात बी-बियाणे, किटकनाशके, खते उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळी माफक दरात बी-बियाणे, किटकनाशके, खते मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. अनेकदा उगवण क्षमता नसलेली बोगस व निकृष्ट बी-बियाणे, किटकनाशके, खते शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. शेतकरी अशी बियाण्याची पेरणी करतो, मात्र नंतर त्याच्या पदरी निराशा पडते. त्यांच्या वेळ व पैसा ही वाया जातो. त्याच्या या फसवणुकीमुळे तो कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करण्यापलीकडे त्याच्याकडे पर्याय उरत नाही.
दरम्यान शेतकऱ्यांनी या संदर्भात महाराष्ट्र ग्राहक पंचायतच्या तळोदा शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. देशाचा अन्नदाता शेतकरी राजाची फसवणूक, पिळवणूक होणार नाही. त्यांना माफक व योग्य दरात बी-बियाणे, किटकनाशके, खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच जे विक्रेते अशी फसवणूक करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड बसणार नाही, फसवणूक, लुबाडणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा. आर. ओ. मगरे, उपाध्यक्ष कीर्तीकुमार शहा, जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी, तालुका सचिव पंडीत भामरे, रसिलाबेन देसाई, अमीबेन तुरखिया, जिल्हा सदस्य राजेंद्र चौधरी तसेच तळोदा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, सचिव प्रा. राजाराम राणे, संघटक रमेशकुमार भाट तसेच शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments