चांगल्याचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः चांगला विचार आत्मसात करा. -पंडित प्रदीप मिश्रा
शहादा,दि.03
येथील मोहिदा तश शिवारातील तहसील कार्यालय परिसरात आयोजित शिव महापुराण कथेस तिसऱ्या दिवशी सुमारे पाच लाखापेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावत कथेचा लाभ घेतला. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखारवानीतून पाच दिवसीय श्री शिव महापुराण महाकथा येथे सुरू आहे.महाशिवपुराण कथेत आज त्यांनी माता कात्यायनी यांच्या जन्माची कहाणी सांगत कन्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले.
शहादा येथील श्री शिव महापुराण महाकथा समितीच्या वतीने आयोजित श्री शिव महापुराण कथेचा गुरुवारी तिसरा दिवस होता.दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या शिव महापुराण कथेच्या प्रारंभी मान्यवरांनी कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले.यावेळी आयोजन समितीचे आमदार राजेश पाडवी,परिसराचे नेते दीपकभाई पाटील,प्रा.मकरंद पाटील, श्यामभाऊ जाधव,शशिकांत वाणी,अजय गोयल, अजय परदेशी,मोतीशेठ जैन, रुपेश जाधव,संदीप सूर्यवंशी उपस्थिती होती.आजच्या कथेस मालेगाव येथील अविष्कार भुसे, नंदुरबारचे विजयकुमार चौधरी, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक निलेश देसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.पंडित प्रदीप मिश्रा यावेळी रामायणातील लंकापती रावणाचे उदाहरण देतांना म्हणाले, कुबेराचे वैभव कैलास पर्वताच्या पायथ्याशी शिवलिंगात आहे. पद,वैभव, प्रतिष्ठा, धन आदि सर्व शिवलिंगाच्या खाली असून आपण शिवजीच्या लिंगास एक लोटा जल चढवून आपल्या दुःखाचे निवारण करावे.व्यक्ती चांगल्यापेक्षा वाईटचाच अधिक शोध घेत असते. जेव्हा आपण स्वतः चांगला विचार करणार तेव्हाच आपल्याला सर्वत्र चांगले दिसणार आहे.वय आणि कमर चाळीसच्या वर गेल्यास भोजन कमी करून भजनात आपला वेळ घालवावा. आसक्ती,तृष्णा,वासना आदि दुर्गुणांचा त्याग करण्यासाठीच भगवान शंकरजी भस्माचा वापर करतात.शंकरजी विरक्तीपेक्षा संपूर्ण कुटुंबाला सोबत ठेवतात.शिवजी तोडणे नव्हे तर जोडण्यायावर विश्वास ठेवतात. पंडित प्रदीप मिश्रा आजच्या कथेच्या शेवटी बोलतांना म्हणाले,स्त्री जीवन संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक असते.ती कुटुंबाला संस्कार आणि संस्कार सागरातून प्रतिष्ठा प्राप्त करून देते.स्त्री जर वाईट विचाराची असेल तर संपूर्ण कुळाचा नाश होतो. सासू म्हणून तिचे कर्तव्य आहे की, तिने सर्व सुनांना समान न्याय द्यावा. विवाहानंतर एक कन्या माहेर व सासर या दोन कुळांचा उद्धार करते. माहेरपेक्षा सासरची तिने जास्त काळजी घ्यावी.सद्यस्थितीत अनेक परिवार तुटत आहेत. न्यायालयात मोठ्या प्रमाणात घटस्फोटासाठी दावे दाखल असून ही परिस्थिती भारताच्या दृष्टीने चांगली नाही.यासाठी सुसंस्कार होणे आवश्यक आहेत.
दरम्यान,गुरुवारी सकाळपासूनच कथास्थळी भाविक महिला व बालिकांची गटागटाने गर्दी दाखल होत होती.पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावल्याने वाहने सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर लावून भाविक कथास्थळी दाखल झाले होते.शहादा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असूनही वाहतूक कोंडी झाली नसल्याचे चित्र दिसून आले.


Post a Comment
0 Comments