श्री शिव पुराण महाकथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी; सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज.
शहादा,दि.02
येथील मोहीदा तश शिवारातील तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी आयोजित श्री शिव महापुराण महाकथेसाठी आज दुसऱ्या दिवशी भाविकांनी प्रचंड प्रमाणात हजेरी लावली.सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्या या गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.
श्री शिव महापुराण महाकथा समिती शहादाच्या वतीने सिहोर येथील शिवभक्त पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून पाच दिवसीय महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 एप्रिल पावेतो महाकथा होणार असून दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच महिला व बालिका,भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कथास्थळी असलेले पेंडॉल संपूर्णत: भरले असून मिळेल तेथे जागा सांभाळत भाविकांनी कथा ऐकली. बुधवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी कथेला प्रारंभ झाला.यावेळी प्रथम पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कथा आयोजन समितीचे प्रमुख आमदार राजेश पाडवी, परिसराचे नेते दीपकभाई पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील,श्यामभाऊ जाधव, अजय गोयल, शशिकांत वाणी, अजय परदेशी, मोतीशेठ जैन, रुपेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंडित प्रदीप मिश्रा यावेळी बोलतांना म्हणाले, शिव महापुराण कथा मनोरंजनासाठी नसून मनोभंजनाचा विषय आहे. ही कथा श्रवण करण्यासाठी भगवान शंकराचीच आज्ञा असावी लागते. शंकर भगवानाशी नाते असलेली व्यक्तीच या कथेसाठी उपस्थित राहते. शिवपुराण कथा म्हणजे पित्याचा पुत्र-पुत्रीशी असलेला संवाद आहे. कथेतून हृदयाशी संवाद साधता येतो.ही कथा ऐकून धनप्राप्ती होईल याची शाश्वती नाही.मात्र पुण्य जरूर मिळेल व त्या पुण्याच्या जोरावरच परमेश्वर आपल्यावर धनाची बरसात करू शकतो.आग,पाप,साप व रोग हे हळूहळू वाढतात मात्र संपूर्ण समाप्ती करून सोडतात.दान,भजन व भोजन हा गुपचूप करण्याच्या विषयी नाही.तसेच विश्वास,भरोसा व दृढतेने आलेल्या प्रत्येक संकटांवर मात करणे शक्य होते.त्यांनी सोशल मीडियावरील सद्यस्थितीत सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील कार्टून प्रकारावर जोरदार हल्ला चढवत सतर्कता व समजदारी बाळगून याचा वापर करण्याचे आवाहनही केले.
दुसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा यांनी टेंबा व सावखेडा येथील कॅन्सर आजारातून बरे झालेल्या 14 वर्षीय बालक व एका बालिकेच्या वडिलांच्या शिवपूजनामुळे आजारातून बरे झाल्याची स्टेजवर बोलावून माहिती दिली.दरम्यान,फक्त वीस दिवसाच्या कालावधीत कथा नियोजन उत्कृष्टपणे केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक करत शहादा नगरीत कथा व्हावी ही भोले शिवशंकरांचीच इच्छा व कृपा असल्याने शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. शहादा व नंदुरबार जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून बायपास रस्त्यासह कथास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताला असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे.


Post a Comment
0 Comments